आनंद तरंग - शक्तीचं धन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:32 AM2019-09-03T01:32:29+5:302019-09-03T01:32:32+5:30
संसारातील सजीव व निर्जीव अशा दोन प्रकारच्या शक्ती आपल्याजवळ असतात. पैसा, जमीन, घर, गाड्या, सोनं इत्यादी या शक्तीच आहेत.
बा. भो. शास्त्री
श्रीचक्रधरांनी शक्तीचं एक सूत्र सांगितलं आहे, मूळ सूत्रातिल एका शब्दावर भाष्य करणारं ते अर्थसूत्र आहे. शक्ती म्हणजे ऊर्जा. निसर्गाने ती चराचराला दिलेली आहे. त्यात देवता, सर्व गुण, सर्व धर्म, ज्ञान, विज्ञान हे प्रमुख शक्तीस्थलं या सूत्रात आले आहेत. ते सूत्र असं ‘शक्ती शब्दें सकळही देवता: सकळही गुण: सकळही धर्म: ज्ञान: विज्ञान: हे सर्व शक्ती शब्दें बोलिजेति : सूत्राचा देह थोडा मोठा आहे आशयही तेवढाच मोठा आहे. मनुष्य हा जन्मताच प्रथम रडतो. तेव्हा रडायला शक्ती लागते. ती अगदी थोडी असते. नंतर हासतां त्यालाही शक्तीच लागते. आई ती दूध व अन्नातून शक्तीचा पुरवठा करीत असते. पुढे आयुष्यभर माणूस हा शक्तीचा संचय करतो खर्चही करतो. ती शरीर मानसिक, वाचिक, बौद्धिक व आत्मिक स्वरूपाची असते. तिचे कार्य वेगळे पण पाचच जागेवरून तिचं वितरण होत असतं. देवते जवळ पंच प्रकार असतात. गुणाच्या साठ्यात विविध गुणांचा संग्रह असतो. धर्माच्या कप्यात सर्व धारणा असतात. ज्ञानाच्या गावात सगळ्या ज्ञानांच्या शाखा असतात. तर विज्ञानाच्या विभागात सर्वच प्रकारचे भाव अभावांची सामुग्री असते. या संपूर्ण शक्ती ज्याच्या मालकीच्या आहेत. त्यालाच शक्तीयुक्त परमेश्वर म्हणायचं. इतरांकडे ऐश्वर्य आहे. त्याच्या जवळ परम ऐश्वर्य असतं. म्हणून तो सर्वशक्तींने युक्त असतो. घरात एकच विद्युतशक्ती फ्रिजमध्ये पाणी थंड करते. हिटरमध्ये गरम, बल्बमध्ये प्रकाश, पंख्यातून हवा तर दूरदर्शन संचातून दृक व श्राव्य कार्यक्रम दाखवते. अनेक जागी विभागलेली नाना रूपाने प्रगट होणारी विद्युत मधली उर्जा एकच असते. तसा शक्ती संपन्न परमेश्वर हा एकमेव असतो. देवता, गुण, धर्म, ज्ञान व विज्ञान असे त्या शक्तींची पाच नावे आहेत. आपल्यात बळ नसेल तर हसणं, रडणं, पाहाणं, चालणं, ऐकणं, बोलणं शक्यच नाही. डोळ्याची पापणी उघडायला किंवा श्वास घ्यायलाही शक्तीच लागते. सर्वच शक्तीचे दोन प्रकार येतात एक आहे जडाशक्ती व दुसरी चेतनाशक्ती.
संसारातील सजीव व निर्जीव अशा दोन प्रकारच्या शक्ती आपल्याजवळ असतात. पैसा, जमीन, घर, गाड्या, सोनं इत्यादी या शक्तीच आहेत. नोटांचे बंडल हालत नाही, चालत नाही; पण त्यात ताकद असते. ते निर्जीव असून सजीव माणसांना हालवतात, पळवतात. या शक्तीला जडाशक्ती असे म्हणतात. त्या निर्जीव वस्तुमधील सामर्थ्य स्वामी एका सूत्रात सांगतात.
‘द्रव्य अस्तित्वे माजवी।’
हजार, पाचशेच्या नोटांची बंडलं घरात होती तर अंगात माज होता. नोटबंदी होताच क्षणात माज गेला. कालचा पैसा आज कागद झाला. सोनं, जमीन, घर, दगड व मातीत पण शक्ती आहे. खडकाळ जमीन बेकीमती होती. समृद्धी महामार्गाने तिच्यात शक्तीसंचार केला. जमीनधारक रंकाचे राजे झाले. चेतनाशक्ती म्हणजे सजीवशक्ती. जसा आपला परिवार, मालकीचे प्राणी, सोयरे, नोकर व स्वत: हिच ती चेतन शक्ती आहे. म्हणून जडाच्या अभावाने गरीबी येते. चेतनांच्या अभावाने जीवन एकाकी होतं. माणूस शक्तीहिन होतो. जिथे दोन्हीचा अभाव आहे, तेव्हा भिकारी होवून भिक मागतो.
शक्तीहिन माणसाला कुठेच किंमत नसते. तो विकास व विनाशही करु शकत नाही. असुरी शक्तीने विनाश तर, दैवी शक्तीने विकास होतो. काय करायचं हे ज्याच्या त्याच्या धारणेवर अवलंबून असतं. मारमेश्वर हा शक्तीयुक्त आहे, हे खरं असलं तरी ज्ञान प्रेमशक्तीने तो आपल्याला जिंकता येतो. शक्तीची गरज ही परमेश्वर अवताराला सुद्धा असते.जशी आपल्याला दोन नजरांची गरज असते. एक जवळची व दुसरी लांबची, तशाच अवर व पर शक्ती आहेत. काही अवतार अवरशक्ती धारण करतात. तर काही परशक्ती धारण करतात.