दान म्हणजे नेमके काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 07:39 PM2018-11-17T19:39:57+5:302018-11-17T19:40:28+5:30

आपल्या संस्कृतीमध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. दानी संस्कृती म्हणून आपली संस्कृती ओळखली जाते.

What is Donation ? | दान म्हणजे नेमके काय ?

दान म्हणजे नेमके काय ?

googlenewsNext

-  सचिन काळे, जालना.

भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. विविध पर्वकाळात विविध प्रकारचे दान करावे. हे आपली संस्कृती शिकवीते. या पर्वकाळात दान केल्याने पुण्य प्राप्त होते. असा एक समज आहे. खरंच या काळात दान केल्याने पुण्य प्राप्त होते का ? कोणत्या प्रकारचे पुण्य मिळते ? पुण्य म्हणजे नेमके काय ? अशा प्रकारचे दान न केल्यास हातून पाप घडते का ? मग दान म्हणजे नेमके काय ?

मनुष्य जीवनात दान ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. प्रत्येक व्यक्तीने काहीना काही दान करावे. असे आपले शास्त्र सांगते. दान व्यक्तीस मोह, माया, मत्सर यांसारख्या प्रवृत्तीनपासून दूर कसे रहावे. हे शिकवीते असे म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. दानी संस्कृती म्हणून आपली संस्कृती ओळखली जाते. म्हणूनच कुठले ही शुभ कार्य करण्या अगोदर आपल्याकडे काहीना काही दान केले जाते. साधे उदाहरण म्हणजे अन्न शिजवण्या आधी घरातील गृहिणी अग्नीला दान देत असते. 

अशा प्रकारचे दान व्यक्तीने फक्त पुण्य मिळवण्यासाठीच करावे का ? या दानाचा व्यक्तीच्या सुप्त मनाशी काही संबंध आहे का ? दान केल्याने व्यक्तीच्या सुप्त मनाशी संवाद साधला जातो का ? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे अध्यात्मात सापडतात. अध्यात्म सुप्त मनाशी संवाद साधण्यास मदत करते. अध्यात्म म्हणजे  व्यक्तीच्या आत्म्याशी सत्कायार्तून संवाद साधणे.  अध्यात्म आपल्याला दानाचा अर्थ सांगताना असे सांगते की, न दाखविण्यासाठी व्यक्तीने केलेले सत्कार्य, चांगले काम म्हणजे दान होय.

याचाच अर्थ व्यक्तीने कुठली ही अपेक्षा न बाळगता केलेले कार्य म्हणजे  दान होय. या मध्ये व्यक्तीस प्रसिद्धीची ही अपेक्षा नसते. वास्तवात व्यक्तीने केलेले हे सत्कार्य फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीस ठावूक असावे. त्यास प्रसिद्धीची ही अपेक्षा नसावी. व्यक्तीने अशा प्रकारचे कार्य केल्यास त्याला एक आत्मिक समाधान प्राप्त होते. यातूनच व्यक्तीचा त्याच्या सुप्त मनाशी संवाद साधला जातो. अशा प्रकारचा संवाद साधण्यासाठी व्यक्तीने दान करावे असे म्हणतात. सुप्त मनाशी संवाद साधने म्हणजेच पुण्य प्राप्त होणे. 

तसे बघितल्यास व्यक्ती हा लालसी आहे. अनेक गोष्टींची लालसा त्याच्या मनात दडलेली आहे. या लालसे मुळेच त्याचा सुप्त मनाशी संवाद साधला जात नाही. ही लालसा व्यक्तीला अनेक वाईट कृत्य करण्यास भाग पाडते. या लालसे पोटी व्यक्ती आपल्या आप्तेष्टांची हत्या करण्यास मागे-पुढे पाहत नाही. आज जगात होणारी प्रत्येक वाईट घटना ही लालसे पोटीच घडत आहे. रामायण, महाभारत हे ही एका लालसे मुळेच घडले.

व्यक्तीच्या मनात असणारी लालसा व्यक्तीस शांत बसू देत नाही. संपत्ती, वासना व्यक्तीस वाईट कृत्य करण्यास भाग पाडते. किती ही संपत्ती प्राप्त झाली. तरी संपत्तीची लालसा कमी होत नाही. शरीरिक भूक पूर्ण झाल्यानंतर ही तिची लालसा व्यक्तीस चैन पडू देत नाही. हे सर्व करत असतांना व्यक्ती स्वत:च्या सुप्त मना पासून लांब जात असते. हेच व्यक्तीला ठाऊक नसते. आपल्या मनाला आवश्यक असणारी मन:शांती व्यक्ती या लालसेत शोधत असते. हे सर्व करतांना व्यक्तीला मन:शांती मात्र मिळत नाही. महाभारत सुद्धा हे लालासेमुळेच झाले. पांडवांचा अधिकार नाकारण्यासाठीच व आपली ( दुर्योधनाची ) लालसा पूर्ण होण्यासाठी हे युद्ध घडले.     

मग या लालसे पासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग नेमका कोणता ? तो मार्ग म्हणजे दानाचा. सुप्त मनाशी संवाद साधण्याचा व मन:शांती मिळविण्याचा मार्ग म्हणजे दान होय. प्रत्येक व्यक्तीच्या मनात काहीना काही लालसा दडलेली असते. या लालसे पोटी व्यक्ती काहीही करायला तयार असते. लालसेतून मन: शांती तो मिळवू पाहत असतो. परंतू या सर्व गोष्टीमधून त्याला योग्य मार्ग सापडावा, सुप्त मनाशी संवाद व्हावा. आत्म्याचा त्याला बोध व्हावा. म्हणून दान करावे असे आपले शास्त्र सागते. हे दान करत असतांना ते दाखविण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी करू नये. 

तसेच हे दान सत्पात्री असावे. म्हणजे चांगल्या मागार्ने प्राप्त मिळकतीतून केलेले असावे. तेव्हा कुठे व्यक्तीस स्वत:च्या सुप्त मनाशी संवाद साधता येतो. तसेच मन:शांती प्राप्त होऊन. आत्म्याच्या बोध होतो. परंतू व्यक्ती जर हे सत्कार्य दाखवण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी करत असेल. तर व्यक्तीस गर्व होतो व व्यक्तीस मन:शांती मिळत नाही. परिणामी त्याचा (स्वत:च्या ) सुप्त मनाशी संवाद होत नाही. यासाठीच दान करावे असे म्हणतात. यासाठी दान म्हणजे, न दाखवण्यासाठी केलेले सत्कार्य होय. हे प्रत्येक व्यक्तीस समजणे आवश्यक आहे. म्हणूनच म्हणतात,  या हाताने केलेले दान त्या हातास कळता कामा नये. प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्ग मिळावा.

सुप्त मनाशी त्याचा संवाद व्हावा. मन: शांती त्यास प्राप्त व्हावी. म्हणून आपल्या संस्कृती मध्ये दानास अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच आपल्या शास्त्रां मध्ये अनेक पर्वकाळात लालसेवर विजय मिळवण्यासाठी. तसेच मन:शांतीतून आत्म्याचा बोध होण्यासाठी दान करण्यास अत्यंत महत्त्व दिले आहे. तसेच कणार्सारख्या दानशूराचे उदाहरण याच आपल्या संस्कृतीत पहायला मिळते.  तसेच संत तुकारामांनी आपले सर्वस्व दानच करून टाकले नाही का ?  आजच्या आधुनिक काळात व्यक्ती फक्त स्वत:ची लालसा पूर्ण करण्यासाठी धावतोय. लालसेतून मिळणारा क्षणिक आनंद त्यास आत्मानंद वाटतोय. सुप्त मनापासून आपण फार दूर आहोत. हेच त्यास कळतं नाहीये. लालसे पोटी केलेले कृत्य, तात्पुरती केलेली मदत दान समजून.

तात्पुरते हास्य चेहऱ्यावर आणून. त्याची क्षणचित्रे आधुनिक काळातील प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध करतोय. आपण केलेल्या मदतीला दानाचा मुलामा समजून व्यक्ती प्रसिद्धीच्या लालसेत नखशिकांत बुडतोय. परंतू ‘सत्पात्री दान व न दाखविण्यासाठी केलेले सत्कार्य म्हणजे दान’ हे ज्या दिवशी व्यक्तीस समजेल व प्रसिद्धीच्या मोहजालातून तो बाहेर पडेल. त्या दिवशी त्याचा सुप्त मनाशी संवाद सुरु होईल. मन: शांतीचा मार्ग त्यास सापडेल व आत्म सुखाचा आनंद त्यास अनुभवता येईल. यासाठी प्रत्येकाने दानाचे महत्त्व, त्याचा अर्थ, सत्पात्री दान समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत या सत्पात्री दानास अत्यंत महत्त्व दिले आहे. असा सत्पात्री दानाचा प्रयत्न प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. ज्यामुळे व्यक्तीला लालसेवर विजय प्राप्त करता येईल. तसेच आज समाजात घडणाऱ्या वाईट घटना यांना आळा बसेल व या संसारात सुख शांती सर्वत्र नांदेल.

Web Title: What is Donation ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.