काय आहे महत्व; जाणून घ्या...क़ा करावी एकादशी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:58 PM2019-07-12T12:58:44+5:302019-07-12T13:00:30+5:30
अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्रतिज्ञा केलेली आहे, संपूर्ण मनुष्य जीवाला सुखी करण्याची प्रतिज्ञा सोप्या, सुलभ साधनेला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. ती साधना म्हणजे पंढरीची वारी होय. या वारीतील नित्यनेम म्हणजे नामस्मरण व हरिपाठ आहे. या साधनेचे मुख्य व्रत एकादशी असून सर्व एकादशीमध्ये महत्त्वाची आषाढी एकादशी मानली जाते. कारण ही एकादशी पांडुरंगाला खूपच आवडणारी असून देवशयनी एकादशी असे म्हटले जाते.
चातुर्मासाला या ठिकाणाहून प्रारंभ होतो. सर्व साधक व भक्तमंडळी चातुर्मासामध्ये नित्यनेम व साधना मोठ्या प्रमाणात करतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साधना खूपच गरजेची असून त्याचा हा मुख्य कालावधी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून व इतर प्रांतांमधून सुद्धा वारकरी भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात. पंढरपूरमध्ये आल्यानंतर दशमीला चंद्रभागेचे स्नान करून पंढरी प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. लाखो भाविकांची या एकादशीला पंढरपूर मध्ये उपस्थिती असते. एकादशी हे व्रत असून ती अवस्था सुद्धा आहे. ‘ व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन अहर्निशी मुखी नाम ’ वारकरी भाविकांच्या दृष्टीने एकादशी हे फक्त व्रत नसून ती एक उपासना आहे. म्हणून सर्व भाविक प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी उपवासाने करतात.
एक दशा म्हणजेच एकादशी होय. अंत:करणाचा एकच विषय असणे, सर्व इंद्रियांचा एकच विषय असणे याला एकादशी म्हटले जाते. वारकºयांना वारीमध्ये व पंढरपुरात इतर काहीही दिसत नाही फक्त पांडुरंगच दिसतो. ‘ ऐका पंढरीचे महिमान राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण ते ही देव जाणावे’ हा भाव प्रत्येक भाविकांच्या मनामध्ये असतो. म्हणूनच पंढरीमध्ये पोहोचल्यानंतर वारी पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाला प्राप्त होते. एकादशी हा फक्त जीभेशी संबंधित विषय नसून तो सर्व इंद्रियांचा विषय आहे. अहर्निशी, सतत भजन, नामस्मरण करणे म्हणजेच एकादशी हा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये स्वीकारलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन आनंदी होते.
जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाचा खूपच अट्टाहास असतो, परंतु इतर प्रयत्नातून आनंदाची प्राप्ती होत नसल्यामुळे माऊलींनी सर्व जीवाला आनंदी बनवण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. ‘किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी भजी जो आधी पुरूखी अखंडित’ मनुष्य देहातील जिवालाच आनंद प्राप्त करता येत असल्यामुळे त्याला वारी करण्याविषयी प्रवृत्त केले जाते. वारीतील सेवाभावातून नित्यनेम व एकादशी हे वृत्त वारकरी संप्रदायाने बंधनकारक सांगितलेले आहे. लौकिकातील एकादशीचा अर्थ आणि वारकरी संप्रदायातील एकादशीचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. आषाढी एकादशीला सर्वच वारकरी पंढरपूरकडे आपल्या प्राणप्रिय विठुरायाला भेटण्यासाठी सर्व अडचणी बाजूला ठेवून निघतात. विवेक आणि श्रद्धेचा समन्वय म्हणजेच वारकरी होय. अशा सर्व वारकरी भाविकांना साष्टांग प्रणाम !
- सुधाकर इंगळे महाराज