- नीता ब्रह्मकुमारी‘देवा! मला चांगली बुद्धी दे’ अशी लहानपणी ईश्वराजवळ प्रार्थना करायचो. खरं तर मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा ईश्वराकडून आपल्याला विवेक आणि स्वतंत्रता मिळते. प्रत्येक व्यक्तीला चांगले-वाईट, चूक-बरोबरचे ज्ञान आहे. ते समजल्यानंतर काय करायचे याचे स्वातंत्र्यही आहे. म्हणूनच सर्वांचे भाग्य वेगवेगळे आहे.एकदा एक राजा जंगलामध्ये शिकार करण्यास गेला. काही अंतरावर त्याला काही लोकांच्या भांडणाचा आवाज ऐकायला येतो. आवाजाच्या दिशेने तो त्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा तिथे तीन व्यक्ती भांडताना दिसतात. राजाला बघताच ते स्तब्ध उभे राहतात आणि गोंधळून राजालाच प्रश्न विचारतात की, ‘राजा, तुम्हीच सांगा आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण?’ राजा आश्चर्यचकित होऊन म्हणतो, पहिले तुम्ही मला स्वत:चा परिचय तरी द्या. पहिली व्यक्ती म्हणते मी कर्म आहे, दुसरा म्हणतो मी भाग्य आहे आणि तिसरा म्हणतो मी बुद्धी आहे. राजाला पण प्रश्न पडतो. राजा उत्तर देतो की, ‘कोण श्रेष्ठ आहे हे समजण्यासाठी तुम्हाला काहीतरी करून दाखवायला लागेल.’ त्याच वेळी एक लाकूडतोड्या जाताना त्यांना दिसतो. राजा त्याच्याकडे बोट दाखवून म्हणतो की, या लाकूडतोड्यामध्ये प्रवेश करून प्रत्येकाला आपली श्रेष्ठता दाखवावी लागेल. सात दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही किती श्रेष्ठ आहात याचे प्रमाण आपल्या सर्वांनाच मिळेल. ठीक आहे? तिघेही या गोष्टींसाठी मंजुरी देतात. पहिला नंबर ‘कर्म’ त्या लाकूडतोड्यामध्ये प्रवेश करतो. कर्म करण्याची शक्ती त्या लाकूडतोड्याकडे आहे. परंतु भाग्य आणि बुद्धी नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर्मठ होऊन तो फक्त लाकडे तोडत राहतो. सात ही दिवस तो खूप परिश्रम करतो. लाकडाचा ढीग तयार होतो, परंतु भाग्य आणि बुद्धी नसल्यामुळे लाकडांचा व्यापार करून पैसे कमवण्याच्या शक्तीचा अभाव दिसून येतो. सात दिवसांनंतरही त्याची परिस्थिती तशीच राहते. (क्रमश:)
कोण श्रेष्ठ? कर्म, भाग्य की बुद्धी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 5:19 AM