कोण म्हणतं.. जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 09:09 PM2019-05-11T21:09:51+5:302019-05-11T21:11:45+5:30
मनात रोज 24 तासात 60,000 विचार येतात त्यातील 60 % विचार हे नकारात्मक असतात...
- डॉ. दत्ता कोहिनकर
सुदामचे वय 35 वर्षे झाले होते, लग्न जुळतच नव्हते. कायमस्वरूपी नोकरी नसल्याने पैशाचीही चणचण भासे. शेतीत पण म्हणावे तसे उत्पादन निघत नसे. त्यामुळे घरातही त्याला फारशी किंमत उरली नव्हती. मित्राकडून घेतलेली उसनवारी वेळेवर परत न केल्यामुळे त्यांचे अपशब्द ऐकायला लागत होते.
आपले नशिबच फुटके - आपण दरिद्री - कर्जबाजारी - कर्तुत्वशून्य अशा विचारांची वादळे सुदामच्या डोक्यात चालता-चालता नकारात्मक विचारांचे वादळ उठायचे व त्याला नैराश्य यायचे. तो जास्त नकारात्मक विचारांकडे ओढला जायचा. त्यामुळे शारिरिक स्तरांवर देखील सुदाम वारंवार आजारी पडायचा. त्याच्या भावभावनांचे दमन व्हायचे. त्यामुळे सुदामच्या नकारत्मक विचारांचा मानस तयार होऊ लागला. त्यामुळे शेवटी सुदामला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागली. मानसोपचार तज्ञांची उपचारपद्धती व औषधे यासाठी सुदामला आईचे दागिने विकावे लागले. सुदामला रोज मानसोपचार तज्ञांची औषधे घ्यावी लागतात.
मित्रांनो, जसा तुम्ही विचार कराल त्या प्रकारच्या तरंगाशी तुम्ही समरस होऊ लागता. भगवान बुद्ध म्हणतात, सब्बो लोको प्रकंपीतो (सर्व विश्व हे तरंग आहे, प्रकंपन आहे.) रेडियोच्या सुईला फिरवताना जे स्टेशन तुम्हाला ऐकायचे असेल त्या स्टेशनवर सुई आणतात व प्रक्षेपण चालू होते. निसर्गात विविध प्रकारच्या तरंगाचे वहन चालू असते. तुमचा विचार हा पण एक तरंगच असतो. त्यामुळे नकारात्मक विचाराला थारा न देता त्याला सकारात्मक करा. नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे यालाच तुकाराम महाराज रात्रंदिन आम्हा, युद्धाचा प्रसंग (मनाचे - मनाशीच युद्ध) असे संबोधतात. मनात रोज 24 तासात 60,000 विचार येतात त्यातील 60 % विचार हे नकारात्मक असतात. त्याला सकारात्मक करण्याची कला अवगत नसेल तर सुदामसारखी अनेक माणसे नैराश्यात (ताणतणावात) जातात म्हणून नकारात्मक विचारांना सकारात्मक करून वर्तमानकाळात अंर्तमनाला सूचना दिल्याने त्या प्रकारच्या विचारांच्या कर्मफळाला गती येते. पूर्वी लोक म्हणायचे, तुम्ही जो विचार कराल त्याला वास्तुपुरूष तथास्तू म्हणतो. आपल्या विचारांना प्रतिसाद देऊन त्या प्रकारच्या कर्मफळाला आपण आपल्या आयुष्यात ओढत असतो. म्हणून वर्तमानकाळात सकारात्मक विचार करणे याची कला अवगत करणे ही एक साधनाच होय. या साधनेचा जास्तीत जास्त सराव करा. लोकसंह्ययेच्या 1 % माणूस हा ठार वेडा व 33 % सीमारेषेवर आहेत. जगातल्या 10 % लोकांना झोपच येत नाही. आत्महत्या खुप वाढल्या आहेत, मधुमेह-उच्चरक्तदाबाचे रूग्ण भारतात सर्वाधिक आहेत. लहान मुलांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरूण वर्ग हिंसा करू लागला आहे. गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांना शरीराबरोबरच मनाची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण। हजार युध्द जिंकण्यापेक्षा मनाचे एक युध्द जिंकणे सर्वश्रेष्ठ असते. म्हणून शरीराबरोबर मनाची काळजी घेणे आवश्यक असते.
मन प्रमुख आहे. या मनावर येणारा ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी माणसे जोडा, एकलकोंडेपणा सोडा, वेळेचे व्यवस्थापन करा, व्यायाम करा, तोंडात लाळ तयार करून ती गिळा (लाळेत अँड्रानील असते, त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते), म्युझिक विशेषतः शास्त्रीय संगीत ऐका, योगा व प्राणायाम करा. डोक्याच्या ब्रह्मरंध्रावर अंगठयाने 4/5 वेळा दाब द्या व सोडा. मनात येणारे विचार - एका फुलस्केप पेपरवर कसलाही विचार न करता भराभर लिहा व ते परत न वाचता फुलस्केप फाडून टाका. (यामुळे दबलेल्या भावनांना रिलीफ मिळतो), आठवडयातून एकदा पायाचा घोटा बुडेल एवढया गरम पाण्यात मुठभर मीठ टाकून त्यात दहा मिनिटे पाय ठेवून बसा, आवडता छंद जोपासा, लहान मुलांबरोबर खेळा, प्राण्यांशी खेळा, लोक काय म्हणतील हयावर जास्त विचार करू नका, भावनांचे दमन करू नका, वेळोवेळी शरीराला मसाज व स्टीम द्या, टाळया वाजवा, जोरजोरात हसा, सकारात्मक विचार करा. शेतात काम करा, सर्वात महत्वाचे रोज सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे शांतपणे मांडी घालून बसा व येणार्या व जाणार्या श्वासाचे तटस्थपणे निरिक्षण करा. श्वासाला आकडा-आकृती-मंत्र याची जोड अजिबात देऊ नका. शुद्ध व स्वाभाविक श्वासाचे तटस्थपणे निरीक्षण हा तणावातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग आहे.
समजा नैराश्याचे प्रमाण जास्तच वाटले-आत्महत्येपर्यंतचे विचार मनात घोळू लागले. तर मात्र मेंदूमध्ये काही रासायनिक घटकांची कमतरता झाल्याने जीव रासायनिक असंतुलन होते. ते घटक वाढवण्यासाठी त्वरित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. मानसोपचार तज्ञांकडे जाणे म्हणजे आपण वेडे आहोत असे मुळीच नाही. अमेरिकेत 60 % लोक कधी ना कधी मानसोपचार तज्ञांची मदत घेतात. अवास्तव अपेक्षा न बाळगता आनंदी रहावयास शिका. ही आनंदी जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी दहा दिवसाचे विपश्यना ध्यानशिबिर करा. विपश्यना केल्यानंतर इतर उपायांची गरजच भासणार नाही. विपश्यनेचे शिबिर हे पुर्णपणे मोफत असते. कोण म्हणत जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंख आहेत, डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरांसारखे पंख आहेत ।