जगातील सर्व सुखे ही पैशांनी खरेदी करता येतात. आलीशान आयुष्य, अद्ययावत सुखसोयींनी युक्त असा फ्लॅट, फ्रिज, टीव्ही, हॉटेल, पार्टी, केवळ पैशांमुळेच मिळतात म्हणून जास्तीत जास्त पैसा जमविण्याची स्पर्धा आज निर्माण झाली आहे. ही घातक स्पर्धाच मानसाला अवनतीकडे घेऊन जात आहे. परंतु, आपण लक्षात घ्यायला हवे की, व्यवहारात पैशाला जी किंमत आहे किंबहुना याहून अधिक किंमत सांसारिक जीवनात सुसंस्कारांना आहे.आज आम्ही पाहत आहोत की, कुटुंबे ही बेसुर होत चालली आहेत. जसे पेरावे तसे उगवते हा निसर्ग नियम आहे. प्रापंचिक जिवनात मात्र आम्हाला या नियमाचे विस्मरण होते. कुटुंबात विविध प्रकारचे घटक राहतात. प्रत्येकाचे विचार निराळे असतात. त्यांच्या स्वभावातही फरक असतो. तरीपण कुटुंबात शांती, सुख, आनंद निर्माण झाला पाहिजे. कारण ह्यवसे शांती ज्या घरी, लक्ष्मी तेथे वास करीह्ण असे म्हणतात. हल्ली कौटुंबिक चौकटच खिळखिळी झाल्याने मानसाची वाटचालही विनाशाकडे होत आहे. वेळीच सावध होणे गरजेचे आहे. मुक्तपणे जीवन जगने ही भौतिक सुखाची व्याख्या झाल्याने मनमानी आयुष्य खुप काही समस्या निर्माण करीत आहे. भ्रष्टाचाराचा कॅन्सर, चंगळवादाचा प्रसार, नितीमुल्यांची घसरण, फुकट खाण्याची प्रवृत्ती हे दृष्य परिणाम वास्तवात दिसत आहेत. यामध्ये परिवर्तन व्हावे म्हणून घराघरात सुसंस्कार वर्धिष्णू व्हावेत असे वाटते.-हभप डॉ. ज्ञानेश्वर मिरगे
पंख असावे आकाशाचे, परी उंबरठ्यावर भक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 3:26 PM