'बुद्धी शुद्ध झाली आणि कृती बदलली'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 09:27 AM2019-07-10T09:27:06+5:302019-07-10T09:29:04+5:30

नदीकाठी वसलेलं एक रम्य परिसर असलेलं गाव. तेथील ग्रामदेवतेचं मंदिर भग्नावस्थेत होतं. अनेकांना वाटायचं मंदिराचा जीर्णोद्धार करावा; पण कुणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. 

Wisdom becomes pure and action has changed | 'बुद्धी शुद्ध झाली आणि कृती बदलली'

'बुद्धी शुद्ध झाली आणि कृती बदलली'

googlenewsNext

रमेश सप्रे

नदीकाठी वसलेलं एक रम्य परिसर असलेलं गाव. तेथील ग्रामदेवतेचं मंदिर भग्नावस्थेत होतं. अनेकांना वाटायचं मंदिराचा जीर्णोद्धार करावा; पण कुणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. 

एकदा संध्याकाळच्या वेळी त्या गावात एक साधू महाराज आले. भगवी वस्त्रं घातलेली, उंच, धिप्पाड, वर्णानं सावळे असल्यामुळे कपाळावर आडवे भस्माचे पट्टे छान दिसत होते. एकूण त्यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक, लोभस होतं. कुणालाही त्यांना पदस्पर्श करून नमस्कार करावा असं आतून वाटायचं. साधूबाबाही त्या गावात स्थिरावले. हळूहळू त्यांना अवगत असलेली मूर्तीकला, ज्योतिषविद्या, आयुर्वेदाचं ज्ञान यांचा उपयोग गावकऱ्यांना होऊ लागला. 

साधूबाबांचा मुक्काम त्या भग्न मंदिराच्या आवारातच होता. त्यांची अनेक मंडळीशी मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल चर्चा व्हायची. शेवटी गावकऱ्यांची एक सभा बोलावली गेली. साधूबाबांनी तिला ‘धर्मसभा’ असं नाव देऊन ते सर्वाना सभेचं आमंत्रण देऊ लागले. अखेर मंदिराच्या उघडय़ा मंडपात, आकाशाच्या छताखाली सभा घेण्याचं निश्चित झालं. ठरलेल्या दिवशी सभा सुरूही झाली. 

साधूबाबांनी सर्वाना मोकळेपणानं आपलं मत मांडण्याचं आवाहन केलं. जीर्णोद्धाराच्या कल्पनेला विरोध असलेल्यांनाही बोलायची संधी मिळणार होती. अनेकांनी आपली मतं मांडली. प्रत्येकाच्या भाषणातील मुख्य मुद्दा सांगून साधूबुवा पुढच्या माणसाला बोलायला सांगायचे. त्या गावाच्या इतिहासात कदाचित इतकी चांगली व्यवस्था असलेली, नियोजित पद्धती प्रमाणे झालेली ती पहिलीच सभा असेल. युवा प्रतिनिधीच नव्हेत तर वयोवृद्ध व्यक्ती नि स्त्रियांनीही आपली मतं मोकळेपणानं मांडली. साधूबाबा मुद्दामच अधिकाधिक लोकांना बोलतं करत होते. यातून जनमानसाचा कानोसा घेता येत होता. शिवाय देऊळ बांधण्यापूर्वी गावातल्या लोकांची मनं एकत्र बांधणं आवश्यक होतं, यात ते यशस्वीही झाले. 

सर्वानुमते सर्वाच्या सहकार्यातून एक सुंदर मंदिर बांधण्याचं ठरलं. गाभारा (गर्भकुड) मोठा असणार होता; पण त्याहून विशाल असणार होता मंदिराचा मंडप. तिथं सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कलांचे मार्गदर्शन नि मुख्य म्हणजे नियमितपणे गावक-यांच्या सभा घेतल्या जाणार होत्या. सभेचा समारोप साधूबाबांनी एका अभिनव प्रयोगाद्वारे केला. पूर्वदर्शनाचा (व्हिज्युअलायझेशनचा) प्रयोग. सर्व गावक-यांना डोळे मिटून ताठ नि स्थिर बसायला सांगितलं. नंतर साधूबाबांनी संकल्पित मंदिराचं मानसदर्शन घडवायला सुरुवात केली. सकाळच्या सूर्योदयापूर्वीच्या संधीप्रकाशात पहाटे मंदिरात मंगलध्वनी सुरू आहे. सनईचे आर्त सूर गावभर तरंगत पोहोचताहेत. अनेक जण काकड आरतीसाठी जमलेयत. नंतर दुपारचा नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, नंतर स्तोत्रपठण, पोथीवाचन, थोडंसं प्रवचन, सामूहिक नामजप त्यानंतरची हृदयस्पर्शी सायंउपासना, रात्री शेजारती होऊन ग्रामदेवतेला गावाच्या रक्षणासाठी जागं ठेवून त्याच्या शेजारी असलेल्या रामपंचायनातील देवांना झोपवणं असे दिवसाचे नित्यकार्यक्रम हुबेहूब वर्णन करून साधुबुवांनी सांगितले. काही उत्सवांची पूर्वउजळणी केली. लोकांना आरतीचा प्रकाश, नैवेद्याची चव, घंटानाद, प्रदक्षिणा यांचा प्रत्यक्ष अनुभव येत होता. 

लवकरच काम सुरू झालं. गावातच असलेल्या सुतार, गवंडी आदींनी सर्व गावकऱ्यांच्या मदतीनं मंदिर उभं केलं. ते पूर्ण झाल्यावर अनेकांनी मंदिरासाठी विविध वस्तू भेट म्हणून आणल्या. सर्वाचं लक्ष एक चांदीचं पात्र वेधून घेत होतं. त्या पात्रत एकाच वेळी तेरा मेणवाती लावण्याची सोय होत. भांडय़ावरची कलाकुसरही देखणी होती. 

मंदिराचं उद्घाटन झालं. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. गाव आनंदानं भरून गेलं; पण तिसरे दिवशी एक वाईट घटना घडली. ते चांदीचं पात्रं चोरीला गेलं. सगळीकडे शोध घेतला. साधूबुवा शांतपणे म्हणाले, ‘सारं देवाचंच तर असतं’ राहिलं त्याची इच्छा, गेलं तरी त्याचीच इच्छा. ते नेणा-याला देव सद्बुद्धी देवो. ..आणि काय चमत्कार! काही दिवसांनी खाली मान घालून एक व्यक्ती आली. ती त्या गावातली नव्हती. तिनं ते मेणबत्ती पात्र साधूबुवांच्या पायाशी ठेवलं नि लोटांगण घालून ओकसाबोकशी रडू लागली. त्या व्यक्तीला पश्चाताप झाला होता. तो एक भुरटा चोर होता. छोटय़ा चोऱ्या करत असे. 

त्याला उठवून अलिंगन देऊन छातीशी धरून साधूबुवा म्हणाले, ‘अरे मी हे पात्र कुणाला तरी बक्षीस देणारच होतो. ते आता तुला देतो. तू चोरी नाही केलीस, मीच तुला ही भेट दिली असं सर्वाना सांगेन’ यावर तो चोर आणखीनच रडत म्हणाला, ‘साधू महाराज मला भेट नको. चोराच्या जीवनातून मला मुक्ती हवीय. मला आपल्या पायाशीच ठेवा. सेवक म्हणून, दास म्हणून माझा स्वीकार करा.’

साधूबाबा प्रसन्नपणे म्हणाले तथास्तु! जमलेल्या मंडळींना उद्देशून म्हणाले, ‘बघा याची बुद्धी शुद्ध झाली नि कृती बदलली. पश्चातापाच्या अश्रूंनी पापं धुतली गेली. आपल्याला आपलं चांदीचं पात्र परत मिळालं, त्यापेक्षाही एक चांगला भक्त नि दास मिळाला. सारी त्या भगवंताची इच्छा!’ साऱ्यांची मनं डोळ्यातल्या पाण्यानं धुतली गेली होती. 


 

Web Title: Wisdom becomes pure and action has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.