-सद्गुरू जग्गी वासुदेवआज अनेक तरुण योग आणि ध्यानाकडे वळत आहेत. तरुण म्हणजे घडत असलेली मानवता होय. ते अजून पूर्णपणे तयार झालेले नाहीत, परंतु त्या दिशेने वाटचाल करत आहेत; ही एक प्रचंड मोठी शक्यता आहे. कारण ते घडत असतात, म्हणून ते त्यांना त्यांच्या इच्छेनुसार हवा तो आकार देऊ शकतात आणि तरुणांकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. त्यामुळे तो काळ असा आहे ज्यात ते स्वत:ला सर्वांगसुंदर मनुष्य किंवा सर्वात अभद्र मनुष्य घडवू शकतात, स्वत:ला एक जबरदस्त शक्यता किंवा एक मोठा अनर्थ होऊ शकतात. जेव्हा कुटुंबात काही तरुण मुले असतात, तेव्हा कुटुंबातील वडीलधारी लोक जरा चिंताग्रस्त असतात. कारण, हे तरुण एक अद्भुत मनुष्य किंवा एक भयंकर अनर्थ बनण्याची शक्यता ते दररोज आपल्यासमोर पाहत असतात. यामुळे वडीलधाऱ्या मंडळींच्या मनात भय निर्माण होते. कारण हे तरुण अजून घडत असतात. तर एक तरुण म्हणजे तो अजूनही बदल स्वीकारायला तयार आहे, जी एक खूप सुंदर शक्यता आहे. तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा आणि बुद्धिमत्ता बहरून येते. पण त्याच वेळेस, त्यांची संप्रेरके किंवा हार्मोन्स त्यांच्या बुद्धीला वेठीस धरू शकतात; ही तरु णाईची एक मोठी समस्या आहे. अचानक ते इतर कोणत्याच दिशेने विचार करू शकत नाहीत. जर युवकांना हे शिकवले गेले की या गोष्टींना दडपून ठेवू नये आणि हा सर्वांच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे, पण त्यापलीकडे जाण्याची आवश्यक तेवढी समज त्यांच्याकडे असेल, त्यांच्याकडे त्यांच्यामधील ही अनिवार्यता हाताळण्याची आवश्यक तेवढी जागृती आणि सजगता असेल, थोडे अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर, ते एक विलक्षण शक्यता आहेत. अन्यथा, तरुणवर्ग फार अनिवार्य आणि सक्तीपूर्ण विषयांमध्ये अडकू शकतात. पण ते जरा अधिक सजग बनले, तर मानवतेचे भविष्य उज्ज्वल आहे. तसे घडून येईल अशी आम्हाला आशा आहे.
तरुणाईची ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 5:14 AM