जपानमध्ये 1868 ते 1912 हा मेईजी काळ होता. या काळात नान इन नावाच्या झेन गुरूचा चांगलाच बोलबाला होता. लांबून लांबून लोक नान इन यांना भेटायला, त्यांचे विचार ऐकायला, त्यांच्याकडून अध्यात्मिक बोध घ्यायला यायचे. एकदा एका विद्यापीठातले प्रख्यात प्रोफेसर झेन बद्दल जाणुन घेण्यासाठी नान इनना भेटायला आले.
नान इन यांनी प्राध्यापकांना चहा विचारला. त्यांनी होकार दिल्यानंतर नान इन चहाचा कप आणि किटली घेऊन आले. प्राध्यापकांच्या समोर त्यांनी कप ठेवला आणि त्यात ते चहा ओतू लागले. कप भरून वाहू लागला तरी नान इन चहा ओततच राहिले.
काही वेळाने ते असह्य झाल्यावर प्राध्यापक म्हणाले, अहो कप पूर्ण भरून वाहतोय. आतमध्ये चहा पडणार नाही, तो बाहेर वाहिल आणि फुकट जाईल.हे ऐकल्यावर नान इन थांबले, प्राध्यापकांच्या नजरेला नजर भिडवत, ते म्हणाले, या कपाप्रमाणेच तुमचा मेंदू पण सगळ्या प्रकारच्या मतांनी भरलेला आहे. जग कसं आहे, कसं असेल या एकूण सगळ्याबद्दलच तुमची ठाम मतं आहेत, अंदाज आहेत.
जर, तुम्ही तुमचा कप रिकामा नाही केलात तर मी तुम्हाला झेन म्हणजे काय ते कसं सांगू शकेन?