धनंजय जोशी
झेन साधना एका परीने अगदी सोपी, आणि एका परीने अगदी कठीण ! आपण सोपी कशी त्याच्याकडे बघूया ! कठीण तर काय सगळ्यांना माहीत असतेच, नाही का?झेन गुरु जोजू यांना एकदा त्यांच्या शिष्याने विचारले, ‘बुद्धाचे स्वरूप कसं असते?’ - त्याला जोजूचे उत्तर होते, ‘जा चहा पी!’ शाब्दिक जगातून जोजूने त्याला ‘प्रेझेंट’मध्ये म्हणजे वर्तमानात, समोरच्या क्षणात आणले होते. तशीच आणखी एक गोष्ट आहे.शिष्य : बुद्धाचे खरे स्वरूप काय आहे?जोजू : आभाळ बघ कसे निळे आहे आणि झाडे कशीहिरवीगार आहेत बघ!शिष्य : ते तर मला माहीत आहेच.जोजू : अरे, खाली बघ, खाली बघ.शिष्याने खाली बघितले आणि एक मोठा साप त्याच्या पायाखालून अचानक सळसळत जाताना दिसला. शिष्य घाबरून उडी मारून बाजूला झाला. त्या क्षणी काय झालं? शिष्याचे शब्दबंबाळ प्रश्न, शाब्दिक ज्ञानाचा सोस सगळं नाहीसं झालं. निळं आभाळ, हिरवी झाडं सगळं काही नाहीसं होऊन राहिला फक्त तो क्षण ! आणि त्या क्षणामध्ये केली गेली एकच क्रिया.. ती म्हणजे उडी मारून बाजूला होणं!‘खाली बघ, खाली बघ’, ही फार मोठी शिकवण झाली. ज्ञान तुमचे प्राण वाचवू शकत नाही. प्रत्येक क्षणाला तुम्ही किती जागरूक आणि विलक्षण लक्ष्य देऊन जगत असता हे महत्त्वाचं ! त्या मनाला म्हणतात ‘जस्ट-नाऊ माइण्ड’ म्हणजे फक्त आताच्या क्षणी जागरूक असलेलं मन!‘मी आत्ता काय करतो/ते आहे?’- हे लगेच विचारून पाहा स्वत:ला!