अरुण बारसकर
सोलापूर : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात मिलेट (पौष्टिक तृणधान्य उत्पादने) सुरू करण्यात सोलापूर जिल्ह्यानेच बाजी मारली आहे. राज्यातील एकूण २८५ मिलेट पैकी तब्बल ९९ प्रक्रिया उद्योग हे सोलापूर जिल्ह्यात तर ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे ७० उद्योग मंजूर झाले आहेत. ज्वारी प्रक्रिया उद्योगासाठी सोलापूर, नंदूरबार व ठाणे या जिल्ह्यांची प्रामुख्याने निवड झाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरातून वेगवेगळ्या धान्य उत्पादनावर गावोगावी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी होती. केंद्र सरकारने मागील वर्षापासून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. शिवाय बँकांना कर्ज मंजूर करण्याच्या सूचना देत अनुदानही दिले. अनुदान मिळण्याची खात्री असल्याने ग्रामीण भागातील तरुण व महिला विविध उद्योग सुरू करण्यास पुढे आल्या व बँकांनीही कर्जाला मंजुरी देण्यास प्राधान्य दिले.
अधिक वाचा: ज्वारी पिकवण्यात सोलापूर नंबर १
मिलेटमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, भगर या तृणधान्यावर प्रक्रिया करणारे राज्यात २८५ प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यात ९९ ज्वारी प्रक्रिया उद्योग मंजूर झाले आहेत. नाचणी व भगरीचे ठाणे जिल्ह्यात ७०, नंदूरबार जिल्ह्यात ज्वारी व बाजरीचे १७, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ व पालघर जिल्ह्यात १२ प्रकल्प हे नाचणी व भगरीचे आहेत.
उसापासून गूळ व इतर पदार्थ तयार करण्याचे राज्यात २५० प्रक्रिया उद्योग मंजूर झाले असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५९, कोल्हापूर जिल्ह्यात ३९, सातारा जिल्ह्यात २९, लातूर जिल्ह्यात २०, भंडारा जिल्ह्यात १२ तसेच इतर जिल्ह्यातही प्रकल्प मंजूर झाले आहेत.
राज्यात ११ हजार ९०० उद्योग मंजूर
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेत राज्यात सर्व प्रकारचे ११ हजार ९०० प्रक्रिया उद्योग सुरु झाले असून औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १०१४, पुणे जिल्ह्यात ६४०, नाशिक जिल्ह्यात ५९७, अहमदनगर जिल्ह्यात ५९४, सांगली जिल्ह्यात ५८३, सातारा जिल्ह्यात ५२७, जळगाव जिल्ह्यात ५२० व सोलापूर जिल्ह्यात ४९२ तसेच उर्वरित जिल्ह्यात विविध धान्यांवर प्रक्रिया उद्योग मंजूर व कार्यान्वित झाले आहेत
सोलापूर जिल्हा व विशेषता मंगळवेढा व बार्शी तालुका राज्यात ज्वारीची कोठार आहे. मंगळवेढ्याच्या ज्वारीला भारत सरकारने जीआय मानांकन अर्थात भौगोलिक उपदर्शन दिल्याने केंद्र सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. जगात उत्तम प्रतीची ज्वारी सोलापूर जिल्ह्यात होत असल्याने मिलेटच्या संदर्भात प्रशिक्षणाचे मोठे केंद्र महाराष्ट्र सरकारने सोलापूरला करणे सोईचे होईल. - अंकुश पडवळे, कृषिभूषण, मंगळवेढा