सोलापूर : ज्याप्रमाणे नागरिकांची जनगणना असते, त्याप्रमाणे पशूचीदेखील गणना होते. यंदा ही गणना स्मार्टफोनवर केली जाणार आहे. त्यामुळे गोठ्यातल्या गायी, खुराड्यातील कोंबड्या अन् तबेल्यातील घोडे यांची माहिती स्मार्टफोनवर येणार आहे.
पाच वर्षांपूर्वी २०वी पशुगणना झाली होती. तेव्हा प्रगणकांना टॅब देण्यात आले होते. त्यावर माहिती भरून घेतली होती. आता प्रगणकांना मोबाइलवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे.
प्रगणकांना मानधन, मोबाइल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे. पशुगणना करण्यासाठी तीन हजार घरांमागे एक प्रगणक नेमण्यात आले आहेत. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले गेले आहे. तसेच, प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी, तसेच पदवीधारक विद्यार्थी प्रगणक म्हणून या मोहिमेत सहभागी होत आहेत.
पशुगणना मोहिमेत गायवर्ग म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, अश्व, वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे. गणना केलेल्या आधारावरच शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात. तसेच निधीची उपलब्धता केली जाते.
१९१९ पासून पाळीव पशुगणनेस सुरुवात
वर्ष १९१९मध्ये पाळीव पशुगणनेला सुरुवात आली. तेव्हापासून दर पाच वर्षांनी गणना केली जाते. पशुपालनाच्या क्षेत्रात धोरणांची निर्मिती आणि विविध योजनांनी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आली आहे. गणनेचा भाग म्हणून दारोदारी जाऊन केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामार्फत देशभरातील पाळीव पशु-पक्ष्यांबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाते.
खरी माहिती द्या, सहकार्य करा
पशुधनाची माहिती घेण्यासाठी प्रगणक येतील, त्यावेळी नागरिकांनी त्यांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. दिलेल्या माहितीच्या आधारे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यानुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे चुकीची माहिती देऊ नये. सर्वांनी पशुगणनेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.