मोहन मोहिते
वांगी : द्राक्षेबागेत सतत येणाऱ्या तण, गवत काढण्यासाठी लागणारी मजुरी परवडत नसल्यामुळे त्यांनी हाताने धरून चालणारे गवत काढणी यंत्र खरेदी केले. हे यंत्र चालवणाऱ्या मजुराच्या मजुरीला वैतागलेल्या वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी तुकाराम नागू माळी यांनी ट्रॅक्टरवर चालणारे तण काढणारे यंत्र बनविले आहे.
शेतीत कोणतेही पीक चांगल्याप्रकारे घ्यायचे असेल तर शेतीत उगवून येणाऱ्या तणाचा नायनाट करणे प्रथम गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्याचा सर्वांत जास्त पैसा खर्च होत आहे. या मजुरांच्या मजुरीच्या पैशामुळे वैतागलेल्या शेतकरी तुकाराम माळी यांनी तीन वर्षांच्या प्रयत्नाने ट्रॅक्टरवर चालणारे गवत कापणारे मशीन तयार केले.
या आधी बाजारामध्ये गवत कापणारे मशीन उपलब्ध होते. पण ते सर्व मनुष्याद्वारे चालविले जायचे त्यामुळे वेळ खूप जास्त जात असे. तसेच मनुष्याला मशीनच्या कंपनामुळे त्रास होत असे, शिवाय खर्चातही वाढू होत होती.
याला पर्याय म्हणून माळी यांनी एकाच वेळेस पाच मशीन चालतील असे गवत कापणारे मशीन तयार केले. जे ५ माणसाचे काम एकाच वेळी करू शकते. तसेच २-३ तासांत एक एकर क्षेत्रातील तण कापण्याचे काम करते.
आठ फुटाचे तण काढणे शक्य
■ एका वेळेस ८ फूट तण काढणे शक्य झाले आहे. तण कापण्यासाठी लागणारा खर्चदेखील कमी झाला.
■ शेतकरी या मशीनचा वापर द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्री, पेरू यांसारखा बागामध्ये करता येत असल्यामुळे तण काढण्यासाठी खर्च कमी.