हायड्रोपोनीक म्हणजे जमिन किंवा मातीशिवाय वनस्पती वाढविणे. हायड्रोपोनीक हा ग्रीक शब्द आहे. हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनीक म्हणजे काम/कार्य करणे, हायड्रोपोनीक म्हणजे पाण्याद्वारे वनस्पती वाढविणे. नैसर्गिक परिस्थितीत वनस्पतींची वाढ करतांना माती हे अन्नद्रव्याचा साठा म्हणून काम करते पिकांच्या वाढीसाठी मातीची गरज असून पाणी, अन्नद्रव्यांची गरज असते त्याच्या साठवणूकीचे काम माती करत असते. दुधाळ जनावरांसाठी हे फायदेशीर आहे.
हायड्रोपोनीक तंत्रज्ञानाची सुरूपात १९६० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झाली. या तंत्रज्ञानासाठी जमिनीची गरज नसते. अत्यल्प प्रमाणत पाण्याचा वापर होतो. सातत्यपूर्ण तसेच सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेता येते. उत्पादन हे प्रतिकुल हवामानात घेता येते. रोग आणि किडीपासून मुक्त असते. काढणी सोपी तसेच वेळ आणि मजूरांमध्ये बचत होते. या तंत्रज्ञानाचा वापर करून उन्हाळ्यात किंवा टंचाईकाळात चांगल्या प्रतिचा हिरवा चाऱ्याचे उत्पादन घेता येते.
फायदे
१) जमिनीची आवश्यकता नाही
या पध्दतीने चारा उत्पादनासाठी माती किंवा जमिनीची गरज नसते. बंदिस्त ठिकाणी याचे उत्पादन घेता येते. यामूळे कमी जागेत किंवा ज्याच्याकडे शेतजमिन नाही असे मजूर या तंत्रज्ञानाद्वारे वर्षभर चारा उत्पादन करू शकतात.
२) कमी जागेत अधिक उत्पादन
चारा उत्पादनासाठी अधिक जागेची/जमिनीची आवश्यकता नसते. एक गुंठा क्षेत्राच्या जागेतून १५ ते २० जनावरांचा हिरवा चाऱ्याचे वर्षभर उत्पादन घेता येते.
३) कमी कालावधीत चारा उत्पादन
हायड्रोपोनीक तंत्रज्ञानाद्वारे हिरव्या चाऱ्याची उत्पादन घेण्याचा कालावधी हा १० ते १४ दिवसांचा आहे. शेतातील चारा पिकांचा उत्पादनाच्या तुलनेत अतिशय कमी कालावधीत चा-याची उपलब्धता होते.
४) कमी पाण्यात उत्पादन
पारंपारिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनीक पध्दतीने चारा उत्पादन घेण्यासाठी अतिशय कमी पाण्याची गरज असते. एक किलो मक्याच्या हिरवा चारा उत्पादनासाठी १.२५ ते २ लीटर पाणी हंगामानूसार हायड्रोपोनीक तंत्राद्वारे लागतो. तर एक किलो मक्याचा चाराचे शेतजमिनीमध्ये उत्पादन घेण्यासाठी ७० लीटर (पावसाळा) ते १४० लीटर (उन्हाळा) पाण्याची आवश्यकता आहे.
५) चवदार चारा असल्यामूळे मुळासह सर्व चनावरे आवडीने खातात.
६) अन्नघटकांचे प्रमाण अधिक
हायड्रोपोनीक तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन घेतल्यास पारंपारिक हिरव्या चाऱ्यापेक्षा अधिक प्रमाणात पोषण मुल्य आढळूण येते.
हिरव्या चाऱ्याचे रासायनिक पृथःकरण (मका)
अन्नद्रव्ये - पारंपारिक पध्दतीचा चारा - हायड्रोपोनीक चारा
प्रथिने - १०.६७ - १३.५७
क्रूड फायबर - २५.९२ - १४.०७
इथर एक्ट्रेक्ट - २.२७ - ३.५९
तसेच कोवळा चारा हा अधिक पचनिय असतो. (७० ते ८० टक्के पचनियता)
७) सेंद्रिय चारा उत्पादन
रासायनिक किटकनाशक किंवा बुरशीनाशकांची फवारण हायड्रोपोनीक पद्धतीचा चारा उत्पादनामध्ये करण्याची गरज नसते त्यामूळे संपूर्णतः सेंद्रिय पध्दतीचा पौष्टीक चारा उत्पादन घेता येते.
८) वेळ आणि मजूरीत बचत
पारंपारिक चारा उत्पादनामध्ये दररोज चारा कापणे, कुट्टी करणे, वाहतूक करणे यासाठी अधिक वेळ, श्रम आणि मजूरांची आवश्यकता असते. या तुलनेत हायड्रोपोनीक तंत्रज्ञानामध्ये कापणे, कुट्टी करणे, वाहतूक करणे या बाबी कराव्या लागत नाही. त्यामुळे वेळेची, श्रमाची आणि मजूरांची बचत होते.
९) वर्षभर हिरवा चारा उपलब्ध
चारा उत्पादनासाठी पावसावर अवलंबून राहावे लागत नाही तसेच शेतजमिनीची आवश्यकता नसते त्यामूळे वर्षभर कमी पाण्यात आणि कमी जागेत हिरवा चारा उत्पादन घेता येते.
१०) नियंत्रित हवामानात वाढ
हायड्रोपोनीक पध्दतीचा चारा हा नियंत्रित हवामानात बंदिस्त ठिकाणी वाढविला जातो. त्यामूळे याची वाढ एकसारखी होते. उत्पादन खर्च पारंपारिक चारा उत्पादनाच्या तुलनेत कमी येतो.
११) चाऱ्याची नासाडी कमी
हायड्रोपोनीक पध्दतीने उत्पादित केलेला चार हा कोवळ्या, लुसलूसीत, पौष्टीक, चवदार असल्याने जुळांसह जनावरे आवडीने चारा खातात. चाऱ्याची उष्टावळ अजिबात होत नाही यामूळे चाऱ्याची नासाडी होत नाही आणि खर्चातही बतच होते.
१२) दुध उत्पादनात वाढ
चारा लुसलूसीत, कोवळा असल्याने जनावरांची पचनियता वाढते आहार पचनासाठी कमी उर्जालागते त्यामुळे दुध उत्पादनासाठी अधिक उर्जा उपलब्ध होते.
१३) सर्वात महत्वाचे म्हणजे टंचाई काळात किंवा दुष्काळी परिस्थितीत जनावरांस हिरवा चारा उपलब्ध करून देता येतो.