Join us

प्रक्रिया उद्योगांसाठी १६ कोटी अनुदान, ३८९ उद्योगांना ४६ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 11:24 AM

अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना, बळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) सुरू करण्यासाठी अनुदान तत्त्वावर योजना आणल्याचा फायदा ...

अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना, बळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) सुरू करण्यासाठी अनुदान तत्त्वावर योजना आणल्याचा फायदा ग्रामीण उद्योजकांना होत आहे. जिल्ह्यात मागील वर्षांत वेगवेगळ्या तब्बल ३८९ उद्योगांना कर्ज- अनुदान मिळाले आहे. शेती उत्पादित धान्यांवर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास यामुळे वाव मिळाला आहे.

बँक तयार झाली की, अतिशय सोप्या पद्धतीने आपण उद्योगापर्यंत जाऊ शकतो, अशी ही पीएमएफएमई योजना आहे. केंद्र सरकारची ही ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. उद्योग सुरू करायची धडपड व प्रबळ इच्छाशक्ती असली की बँका कर्ज देण्यास तयार होतात. शासनाचे बँकांना या योजनेसाठी प्राधान्याने कर्ज देण्याचे तसे आदेश आहेत.

मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षात यासाठी ७०० तरुण- महिलांनी अर्ज केले होते. मात्र, बँकांनी ३८९ उद्योजकांसाठी कर्ज मंजूर केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागील वर्षापेक्षा यावर्षी (२०२४-२५) उद्दिष्ट वाढवून देण्यात आले असून, ४१५ उद्योगांना हे कर्ज देण्याचे धोरण आहे. घरबसल्या उद्योग करायला संधी असल्याने अनेक युवक उद्योग उभारणीसाठी प्रबळ प्रयत्न करीत आहेत.

मागील वर्षी ४३७ उद्योगांचे उद्दिष्ट

मागील २०२३-२४ वर्षी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे ४३७ इतके उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ३८९ विविध उद्योग मंजूर झाले.

अन्नप्रक्रिया उद्योग मंजुरीत सोलापूर जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर • आहे. जिल्ह्यात शेती उत्पादनात आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास मोठा वाव असला तरी उद्दिष्ट कमी देऊनही ते पूर्ण झाले नाही.

3 जिल्ह्यात मंजूर उद्योगांना ४५ कोटी ९५ लाख रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी १५ कोटी ५७ लाख रुपये अनुदान केंद्र सरकार देणार आहे. शेतीमालावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगासाठी बँका कर्ज देतात. आपण • निवडलेला उद्योग उभारला की, बँक कर्जाची रक्कम देते.

उद्योगासाठी mofpi. Government.in या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्तींना संपर्क करायचा आहे.

टॅग्स :अन्नबँकशेतीव्यवसाय