Join us

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी ३० कोटींचा निधी वितरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 9:02 PM

सदरचा निधी हा विद्यमान आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूदीमधून वितरित करण्यात येत असल्याने त्याचा विनियोग हा चालू वर्षामध्येच करण्यात यावा.

PMFME Scheme : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)  २०२३-२४ या वर्षात राज्यात राबविण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात आला असून आता या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.

दरम्यान, सर्वसाधारण प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्यापोटी २० कोटी ५५ लाख १३ हजार रूपये व राज्य हिस्सा १० कोटी ४३ लाख ९५ हजार ११० रूपये असा एकूण ३० कोटी ९९ लाख ०८ हजार ११० रूपये निधी राज्य नोडल एजन्सी (PMFME) तथा आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यंदा ही योजना राज्यात राबविण्याकरिता नोडल एजन्सी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) तथा आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी तर सहाय्यक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सदरचा निधी हा विद्यमान आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूदीमधून वितरित करण्यात येत असल्याने त्याचा विनियोग हा चालू वर्षामध्येच करण्यात यावा असेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.

काय आहे ही योजना?ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठीच लागू आहे. या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्याला संबंधित प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख तर गट लाभार्थ्यांसाठी ३५ टक्के किंवा ३ कोटी रूपयापर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सामावेश असून सर्व उद्योजक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी