अरुण बारसकरसोलापूर : राज्यात ज्वारी उत्पादनात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मिलेट ची घोषणा झाल्यानंतर ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल ४ कोटी ९४ लाख रुपयांच्या बँक कर्जावर ९८ प्रकल्प सुरू झाले आहेत. मात्र आता मिलेट' बारामतीला हलविल्याने नव्याने ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात रब्बी हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात ही ज्वारीची पेरणी केली जाते मात्र सोलापूर जिल्ह्यात ज्वारीची पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळेच सोलापूर शहरालगत शेळगी येथील ज्वारी कोरडवाहू संशोधन केंद्राच्या जागेवर मिलेट ट्रेनिंग सेंटर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या बजेटमध्ये मंजूर करण्यात आले होते.
आता प्रक्रिया उद्योगावर ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार असल्याने शेतकरी गट, महिला बचत गटांना अनुदान व सुविधा, प्रक्रिया उद्योगांना इतर सुविधांसाठी अर्थ सहाय्य, ज्वारी नवनवीन विकसित वाणाचे मोफत बियाणे वाटप तसेच गरजेनुसार केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविता आल्या असत्या, मात्र मिलेट सेंटर आता सोलापूर ऐवजी बारामतीला होणार असल्याने ज्वारी प्रक्रिया उद्योग मंजुरीचा वेग कमी होणे स्वाभाविक आहे. मागील आर्थिक वर्षांत व यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ९८ ज्वारी प्रक्रिया उद्योग मंजूर झाले आहेत. बँकांनी या प्रकल्पांना ४ कोटी ९४ लाख रुपये मंजूर केले आहेत.
सरकारचे दीड कोटी अनुदानया ९८ ज्वारी प्रक्रिया उद्योगाला केंद्र सरकार १ कोटी ५३ लाख ५० हजार रुपये अनुदान देणार आहे. म्हणजे बँकांचे साडेतीन कोटी कर्ज परतफेड करणाऱ्या उद्योगांना १ कोटी ५३ लाख ५० हजार रुपये अनुदान देणार आहे.
बँक ऑफ इंडियाचा पुढाकारज्वारी प्रक्रिया २९ उद्योगासाठी बँक ऑफ इंडिया, स्टेट बैंक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र प्रत्येकी १७, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १०, बँक ऑफ बडोदा य सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रत्येकी ६, युनियन बँक ऑफ इंडिया ५, कॅनरा व आयडीबीआय बँक प्रत्येकी ३ तर एचडीएफसी बँकेने २ प्रकल्पांना कर्ज दिले आहे.
मिलेट सेंटर उभारणी व इतर बाबींसाठी २०० कोटी शासन देणार होते, त्यातून ज्वारी प्रक्रिया उद्योगाला वेगवेगळ्या सवलती देऊन जिल्ह्यात उद्योगाला चालणा मिळाली असती. राज्यातील कोरडवाहू संशोधन केंद्र सोलापूरमध्ये असल्याने मिलेट सेंटर येथेच उभारले जाईल असे वाटत होते. मात्र आता ज्वारी उत्पादन सोलापुरात व ट्रेनिंग व इतर सुविधा बारामतीत असे होणार आहे. - संजय पाटील, बार्शी