Join us

हळद काढणीनंतर कमी खर्चात सोप्या पद्धतीने अशी करा हळदीवर प्रक्रिया; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:06 IST

Halad Prakriya शेतातून खणून काढलेली हळद आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते.

शेतातून खणून काढलेली हळद आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते.

पारंपारिक पद्धत- कढईत हळद भरून वर हळदीचा पाला किंवा गोणपाट टाकून कढईचे वरचे तोंड बंद करून हळद शिजवली जाते.- काही ठिकाणी कढईच्या वर अर्धगोलाकार पद्धतीने हळद भरून वर तोंड पाला टाकून चिखल मातीने लिंपून घेऊन हळद शिजवली जाते.- कढईत जेवढी हळद जास्त तेवढा जास्त वेळ हळद शिजविण्यासाठी लागतो.

नवीन पद्धत- हळद शिजविण्याच्या नवीन पद्धतीनुसार तेलाच्या बॅरलचे सच्छिद्र ड्रम तयार करून त्यामध्ये हळद भरून मूळच्या कढईत फक्त पाणी टाकून उकळत्या पाण्यात हे योग्य प्रकारे शिजते.- या कामी कमी वेळ, कमी मजूर, कमी इंधन लागते. अशा मालास चांगली चकाकी येते. परिणामी चांगला बाजारभाव मिळतो.- अशा पद्धतीचा वापर केल्यास कमी वेळात हळद व्यवस्थित शिजवली जाते आणि श्रम, मजूर, इंधन यांचा अपव्यय टाळता येतो.

हळद शिजवल्यानंतरची प्रक्रिया- शिजवलेली हळद ही चांगल्या कठीण फरशीच्या किंवा सिमेंट कॉंक्रीटच्या खळ्यावर वाळवावी लागते.- त्यासाठी ताडपत्री किंवा बांबूच्या चटयांचा वापर केला जातो. हळद वाळविण्यासाठी जमिनीवर टाकू नये.- हळद वाळविण्यासाठी दहा ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. ढगाळ हवामान असेल तर हळद वाळविण्यासाठी जास्त दिवस लागतात.- पाऊस, दव, धुके यापासून हळदीचे रक्षण करावे. पावसाची शक्यता असल्यास सायंकाळी हळद गोळा करावी व ताडपत्रीखाली झाकून ठेवावी.- पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हात पसरावी वाळत घातलेली हळद भिजल्यास तिच्या प्रतीवर परिणाम होतो. परिणामी मालास चांगला भाव मिळत नाही.

हळद वळवल्यानंतरची प्रक्रिया- शिजवून, वाळवून तयार झालेली हळद विक्रीसाठी पाठवली जात नाही. कारण ती आकर्षक दिसत नाही.- हळकुंडावर साल व मातीचा थर बसलेला असतो. त्यासाठी हळद ही कठीण पृष्ठभागावर घासावी लागते.- घासल्यानंतर हळकुंडावरील साल व मातीचे कण निघून जातात व हळकुंड गुळगुळीत होते.- त्याला चांगली चकाकी व पिवळेपणा येतो आणि ते आकर्षक दिसते. अशा मालास चांगला बाजारभाव मिळतो.- यासाठी हळद पॉलिश करणे गरजेचे आहे. हळद कमी असल्यास गोणपाटाने पॉलिश करणे गरजेचे आहे.

पॉलिशसाठी ड्रमचा वापर- जास्त हळद असल्यास पाण्याच्या बॅरलचा ड्रम तयार करून त्याला सर्वत्र छित्र पाडून स्टॅण्ड व कणा बसवून त्याचा उपयोग पॉलिशसाठी करता येतो.- याशिवाय याच तत्त्वावर मोठे डबे तयार करून ते इलेक्ट्रिक मोटारवर फिरवून हळदीचे पॉलिश व्यापारी तत्त्वावर करून मिळते.- सध्या तयार हळद पावडरसाठी वाढती मागणी असल्याने बचत गटाच्या माध्यमातून हा व्यवसाय जोमाने सुरू आहे.

अधिक वाचा: नारळापासून विविध पदार्थ बनविण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलंय हे नवीन यंत्र; वाचा सविस्तर

टॅग्स :काढणी पश्चात तंत्रज्ञानकाढणीपीकशेतकरीबाजारमार्केट यार्डशेती