Join us

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फॅशन जगतात केळीचा असाही उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 5:01 PM

केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता केळी फळांसोबतच खोडातील धाग्यांपासूनही उत्पन्न मिळणार आहे.

केळीची काढणी केल्यानंतर केळीच्या झाडापासूनही शेतकऱ्यांना आता उत्पन्न मिळणार असून केळीच्या खोडापासून तयार झालेल्या तंतूंचा वापर आता तयार कपड्यांच्या उद्योगात केला जात आहे. त्यामुळे केळीच्या धाग्याला भविष्यात महत्त्व येणार असून केळीचे फळ, पाने यांबरोबर केळीच्या धाग्यातून शेतकऱ्यांना पैसे कमविण्याची संधी आहे.

फॅशन जगतात केळीचे धागे केळीचे धागे आता फॅशन इंडस्ट्रीमध्येही वापरले जात आहेत, तेही वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार करताना. ब्रँडेड उत्पादने तयार करण्यासाठी केळी आता वापरली जात आहे. ज्याचा थेट परिणाम केळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. 

केळीचे खोड आणि सालीमध्ये नैसर्गिक फायबर आढळते. ज्याचा वापर दागिन्यांपासून कपड्यांपर्यंत सर्व काही बनवण्यासाठी केला जात आहे. केळीच्या फायबरपासून विणलेले कपडे फॅशन जगतात वेगळा ठसा उमटवू शकतात. त्यासाठी राष्ट्रीय केळी संशोधन संस्था (NRCB) संशोधन कार्यात गुंतलेली आहे. संस्थेने मुंबईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन टेक्नॉलॉजीशी औपचारिकपणे करार केला आहे. या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना लवकरच फळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. केळीच्या तंतूंमध्ये हानी करणार नाही असे  रसायने मिसळून लांब आणि मजबूत तंतू तयार करण्याचे काम सुरू आहे.

सध्या भागलपूरच्या रेशीमनगरीत आता केळीच्या तंतूंपासून कपडे तयार केले जात आहेत. अशा प्रकारे तयार केलेले कपडे नायजेरिया आणि केनियाच्या लोकांना खूप आवडतात. बंगाल, यूपी, दिल्ली आणि हैदराबादमधूनही अशा कपड्यांना मागणी आहे. पण तुलनेने परदेशात जास्त कपडे विकले जात आहेत. हबीबपूर, हुसेनाबाद, शहाजंगी, बदरपूर, पुरैनी इत्यादी ठिकाणी ५० हून अधिक विणकर हातमागावर केळीच्या फायबर धाग्यापासून कपडे तयार करत आहेत. याशिवाय पाचशे हून अधिक महिलांचाही या रोजगारात सहभाग असून त्या तंतू कापून धागे तयार करतात.

(यांसारख्या उपयुक्त व माहितीपूर्ण बातम्यांसाठी लोकमत ॲग्रो व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा :  https://chat.whatsapp.com/C4PI000UzoO6Nxvnhfn8q1)

असे आहेत केळीतंतूंचे गुणधर्म 

  • आतील थर रेशमासारखा मऊ असतो.
  • बाहेरचा थर कापसासारखा खडबडीत असतो.
  • आतील फायबर अतिशय नाजूक असते, तसेच, रेशीमपेक्षा उत्पादन करणे अधिक महाग असते.

असे तयार होतात कपडे केळी झाडाची साल आणि खोडातील तंतू वेगळे केले जातात.  तंतूधागे मिळविण्यासाठी विविध तंत्रांचा वापर केला जातो.  ज्यामध्ये केळीची साल पाण्यात किंवा काही रासायनिक पदार्थात भिजवून तंतू मऊ करून वेगळे केले जातात. तंतू मिळाल्यावर ते एकत्र करून वाळवले जातात. वाळल्यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर तंतू गटांमध्ये विभागले जातात.

"अ" गटामध्ये उत्कृष्ट तंतूंचा समावेश होतो आणि ते रेशीम-पर्यायी वापरासाठी वापरले जातात.. वेगळे केलेले तंतू नंतर सुतामध्ये रुपांतरीत केले  जातात. यार्नवर प्रक्रिया केली जाते आणि रंगविले जाते. त्यानंतर या धाग्यांपासून कापड, उपकरणे, सजावटीच्या वस्तू किंवा औद्योगिक उत्पादने तयार केली जातात.

टॅग्स :केळीफॅशनशेती