Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > कडधान्यांपासून डाळ तयार करून कमवा अधिक नफा, कशी कराल डाळ?

कडधान्यांपासून डाळ तयार करून कमवा अधिक नफा, कशी कराल डाळ?

Earn more profit by preparing dal from pulses, how to make dal? | कडधान्यांपासून डाळ तयार करून कमवा अधिक नफा, कशी कराल डाळ?

कडधान्यांपासून डाळ तयार करून कमवा अधिक नफा, कशी कराल डाळ?

जात्यावर किंवा चक्कीवर कडधान्य भरडून डाळ तयार केली जाते. या डाळीचा उतारा ५८ टक्यांपेक्षा जास्त मिळत नाही कारण या पध्दतीत भरपूर प्रमाणात साल असलेली तसेच तुकडे झालेली डाळ तयार होते. अशावेळी डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला ने डाळ प्रक्रिया यंत्र उपयुक्त ठरत आहे.

जात्यावर किंवा चक्कीवर कडधान्य भरडून डाळ तयार केली जाते. या डाळीचा उतारा ५८ टक्यांपेक्षा जास्त मिळत नाही कारण या पध्दतीत भरपूर प्रमाणात साल असलेली तसेच तुकडे झालेली डाळ तयार होते. अशावेळी डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला ने डाळ प्रक्रिया यंत्र उपयुक्त ठरत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रातील बऱ्याचशा खेड्यात जाऊन पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की, जरी ग्रामीण स्तरावर उत्पादन जास्त असेल तरी शेतकरी ते कमी भावात विकून त्याबद्दल तुलनात्मक जास्त भावाने तयार डाळ खरेदी करतात. साधारणपणे ग्रामीण विभागात आवश्यक असलेल्या डाळीच्या १० ते १५ टक्के फक्त खेड्यातून तयार केली जाते. त्यासाठी जात्यावर किंवा चक्कीवर कडधान्य भरडून डाळ तयार केली जाते. या डाळीचा उतारा ५८ टक्यांपेक्षा जास्त मिळत नाही कारण या पध्दतीत भरपूर प्रमाणात साल असलेली तसेच तुकडे झालेली डाळ तयार होते व त्या डाळीला बाजारात भाव मिळत नसल्याने ती फक्त घरी खाण्यापुरतीच सिमित आहे.

या सर्व बाबींचा विचार केला असता खेड्यात डाळ प्रक्रिया केंद्र उभारणे आवश्यक आहे. भा.कृ.अ.प. अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला ने डाळ प्रक्रिया यंत्र तयार केले असून आतापर्यंत भरपूर ठिकाणी यंत्राची उभारणी केली आहे. त्यांची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे.

डाळ तयार करण्याची प्रक्रिया
सफाई आणि प्रतवारी

बाजारातून आणलेल्या किंवा शेतात उत्पादीत केलेल्या तुरी एकसारख्या आकारमानाच्या नसतात. त्यात थोडा काडी कचरा, माती, अपरिपक्व दाणे तसेच लहान खडे वैगेरे असतात, त्या स्वच्छ करून एकसारख्या आकारमानाचे दाणे वेगळे काढणे आवश्यक असते. कारण बारीक आणि अपरिपक्व दाण्यापासून मिळणारी डाळ हलक्या प्रतिची असते अशी डाळ चांगल्या डाळीत मिसळल्याने सर्वच डाळीची प्रत बिघडते. म्हणून डाळ बनविण्यासाठी वापरात आणलेल्या तुरी सारख्या आकारमानाच्या असणे जरूरीचे आहे. यालाच प्रतवारी करणे असे म्हणतात.

धान्याची सफाई व प्रतवारी करण्याकरीता भा.कृ.अ.प. अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला योजने अंतर्गत तयार केलेल्या सफाई व प्रतवारी या यंत्राचा वापर करावा. या यंत्राच्या चाडीमधून कडधान्य गोल चाळणीवर जाण्याचा अगोदर पंख्याद्वारे कडधान्यातील काडी कचरा साफ होतो. चाळण्यावर कडधान्य गेल्यानंतर कडधान्य तीन प्रति मध्ये वेगवेगळे होते. या यंत्रामध्ये पंख आणि गोल चाळणी असे दोन महत्वाचे भाग असून यातील गोल चाळणी ही चार भागात विभागली आहे. या यंत्रामध्ये तूर, मुग, उडीद तसेच इतर कडधान्य आणि धान्यांचीही प्रतवारी करता येते.

कडधान्य वाळविणे
थोड्याशा तुरीपासून डाळ करावयाची झाल्यास त्या उन्हा वाळविणे शक्य होते. परंतू भरपूर प्रमाणात किंवा गृह उद्योजकाला ते परवडण्या सारखे नसते. मोठ्या डाळ मिल सुद्धा हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावत असतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास भरपूर प्रमाणात शेतावर उपलब्ध असलेल्या पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या, धसकटे, काडी कचरा, इ. चा वापर करून कडधान्य वाळविण्याकरीता कचरा ज्वलीत शुष्कक हा उत्तम पर्याय आहे. या शुष्ककामध्ये मुख्यत्वे करून विद्युत पंखा, भट्टी, उष्णता परिवर्तक व कडधान्य वाळविण्याची कोठी हे चार भाग आहेत. कचरा जाळल्यामुळे तयार होणाऱ्या उष्णतेमुळे पंख्याद्वारे आत येणारी हवा गरम होऊन कडधान्याच्या कोठी खालील उष्ण हवा पसरविणाऱ्या जागेमध्ये जाते. त्या उष्ण हवेद्वारे कोठीमध्ये असलेले कडधान्य वाळविले जाते.

अधिक वाचा: वैयक्तिक विहीर व बागायती लागवड योजनेसाठी कुठे कराल अर्ज?

मिलिंग करण्यापूर्वी सुरक्षित साठवण सुनिश्चित करण्यासाठी कडधान्य वाळविणे आवश्यक आहे, कारण मिलमध्ये मिळणाऱ्या कडधान्यांमध्ये सामान्यतः जास्त आर्द्रता असते. साल मोकळी करण्यासाठी कडधान्य भीजवल्यानंतर डाळ वाळविणे देखील आवश्यक आहे (ओलावा १०% पर्यंत). विभाजनेच्या प्रक्रिये दरम्यान देखील, कडधान्यांना दोन भागात वेगळे करण्यासाठी खूप आवश्यक आहे. मळणीनंतर, धान्यांच्या आर्द्रतेचे प्रमाण साधारणपणे धान्यांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी हवेपेक्षा जास्त राहते (१३- १४%), वाळविणे हा कापणीनंतरच्या व्यवस्थेचा टप्पा आहे ज्या दरम्यान उत्पादन सुरक्षित-आर्द्रता पातळीवर येईपर्यंत जलद वाळवले जाते. वाळवण्याचे उद्दीष्ट म्हणजे सुरक्षित साठवण आणि पुढील प्रक्रियेसाठी धान्यातील आर्द्रता कमी करणे आवश्यक आहे. हा शुष्कक निरनिराळे कडधान्य, धान्य, शेंगा आणि कणसे सुध्दा वळविण्याचा कामास येऊ शकतो. हा शुष्कक विद्युत हिटरवरही चालू शकतो.

डाळ तयार करणे
तुरीची टरफले डाळीला घट्ट चिकटलेली असल्याने, त्यापासून डाळ तयार करणे सर्वात जास्त जिकिरीचे आहे. त्यामुळे भरडण्याआधी तुरीवर प्रक्रिया करावीच लागते. उदाहरणार्थ चक्कीवर डाळ तयार करावयाची असल्यास प्रथम तुरी ६ ते ८ तास भिजवुन ३ ते ४ दिवस वाळवितात ही पूर्व प्रक्रिया आहे. मोठ्या डाळ मिल मध्ये तेलाचा वापर करून तुर उन्हात वाळवितात. या प्रक्रियेत तुर चार रोलरमधून पाठवून त्याची डाळ तयार होते. पंकृवि मिनी दाल मिल मध्ये मात्र त्या तिनच वेळा रोलरमधून पाठवाव्या लागतात. त्यामुळे डाळीचा उतारा ३ ते ४ टक्यांनी तसेच ग्रेड-१ डाळीचा उतारा ५ ते ६ टक्यांनी मोठ्या डाळ मिल पेक्षा जास्त मिळते.

तुरीपासून डाळ तयार करण्यासाठी पंकृवि मिनी दाल मिलचा उपयोग करावा. ही तीन अश्व शक्तिच्या विद्युत मोटारवर चालणारी दाल मिल रोलर, पंखा, स्प्लीटर आणि चाळणी या चार भागांनी तयार केलेली आहे. यंत्र चालकाच्या मदतीने तुर रोलरच्या चाडीत टाकता येतात. यामुळे कच्या मालाचा सतत दाल मिलला पुरवठा होत राहतो. रोलर हा महत्वाचा भाग असुन, त्याचा उपयोग दाण्याची टरफले वेगळे करण्यासाठी होतो. त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारची एमरी असल्याने टरफले काढणे सोपे होते. रोलरच्या भोवती वर्तुळाकार चाळणी बसविलेली आहे. चाळणी आणि रोलरच्या मधील मोकळ्या जागेतून दाणे सुलभपणे बाहेर पडण्याकरीता रोलरचा आकार कापलेल्या शंकू सारखा केला आहे. दाण्याचा ओघ रोलर मध्ये जाण्याचे आणि बाहेर पडण्याचे नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा बसविलेली आहे.

रोलरमधून बाहेर आलेल्या मिश्रणातून टरफले वेगळे करण्यासाठी पंखा दिलेला आहे. हा पंखा पुढे घटकला जोडला आहे. त्यातून टरफले खाली पडून हवा वरील पाईपातून बाहेर निघून जाते. रोलरच्या चाळणीतून पावडर वेगळी बाहेर पडते. रोलर मधून निघणारे बाकीचे मिश्रण चाळण्यांचा साहाय्याने वेगवेगळे केले जाते. वरच्या लांबोळे छिद्र (स्लॉट) असलेल्या चाळणीवरून गोटा व तुरी वेगळ्या केल्या जातात. खालच्या चाळणीवरून डाळ वेगळी होते. तसेच खाली पडलेली चुरी वेगळी होते. हे तीनही भाग निरनिराळ्या तीन बहिर्द्वारातून बाहेर येतात. तुरीला तेल व्यवस्थित लावण्याकरीता एक वाहक दिलेला आहे. शेवटी उरलेल्या गोट्यास पाणी लावून ५-६ तास ढीग करून ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर उन्हात वाळवून त्याची उद्वाहकाच्या साहाय्याने डाळ केली जाते.

अधिक वाचा: साठेखत म्हणजे काय? ते करणे का आवश्यक असते

या दाल मील मध्ये सर्व प्रकारच्या कडधान्याच्या डाळी व मोगर तयार करता येतात तसेच रोलर बदलवून गहू सफ्फ्राई, काळ्या ज्वारीला व मुगाला चकाकी आणता येते. चाळण्या बदलल्यास पंकृवि मिनी दाल मील यंत्र वेगवेगळ्या प्रकारचे धान्य सफाई करण्याकरीता उपयोगात आणता येते. या यंत्रामध्ये दाळीचा उतारा तुरी करीता ७२-७५ टक्के तर मुग व उडीदाकरीता ७५- ७८ टक्यांपर्यंत मिळतो. या दाल मिलची क्षमता १००-१५० किलो/तास आहे.

डाळ पॉलिश करणे
पंकृवि स्क्रू पॉलीशरच्या उपयोगाने पंकृवि मिनी दाल मिलच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या डाळीला पालिश करता येते. या पॉलीशर मध्ये नायलॉनच्या दोराच्या सहाय्याने व पाण्याचा वापर करून डाळ पॉलिश करण्याची व्यवस्था केली आहे. डाळीला पॉलिश केल्याने चकाकी येते व त्यामुळे डाळीला बाजारात जास्त भाव मिळतो.

गव्हाची सफाई करण्याकरीता दाल मिलचा उपयोग
गव्हामध्ये असलेला काडी-कचरा साफ कण्यासाठी व पॉलिशिंगसाठी पीकेव्ही मिनी दाल मिलचा उपयोग केला जातो. दाल मिल मधला रोलर बदलून गहू साफ करता येते.

कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

Web Title: Earn more profit by preparing dal from pulses, how to make dal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.