आंबड गोड जांभूळ फळ अनेक विटॅमिन्स आणि खनिजांचं भांडार आहे. आयुर्वेदात तर जांभळाच्या औषधी गुणधर्मांची आख्याने सापडतात. सध्या सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देत असताना जांभळाच्या बीया शेतकऱ्यांना चांगली कमाई करून देण्याचा मार्ग ठरत आहे.
जांभूळ खाऊन त्याच्या बीया फेकून दिलं जातं. पण याच जांभळाच्या बीयांपासून बनवलेल्या पावडरला आजार बरे करण्यासाठी वापरले जाते. जांभळाच्या बीयांमध्ये मधूमेह आणि बीपी आवाक्यात ठेवण्याची शक्ती असल्याचे सांगितले जाते. तसेच या जांभूळ बीयांचे चूर्ण पाचनशक्ती वाढवणारे असून अनेकजण चहामध्येही आवर्जून या पावडरचा वापर करतात.
सध्या अनेकजण काजू, बदाम तसेच वाळलेल्या फळांची पावडर बनवायचा व्यवसाय करत असताना जांभळाच्या बीयांची पावडरही बनवू लागले आहेत. याच्या आयुर्वेदिक आणि पचनाशी संबंधित आजार दूर करण्याच्या क्षमतेमुळे या पावडरच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे.
चहातही होतो जांभूळ बीज पावडरचा वापर
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या पित्त व पचनाशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. यासाठी अनेकजण चहामध्ये जांभळाच्या बीयांच्या पावडरचाही वापर करू लागले आहेत. या पावडरमध्ये ॲन्टिऑक्सिडन्ट गुणधर्म असून यूरिन इन्फेक्शन व अन्य आजारांच्या संक्रमणासाठी या चहाला पसंती दिली जाते.
जांभूळ अनेक औषधी गुणांचे भांडार
मधूमेह व रक्तदाबाला मर्यादेत ठेवणारे फळ अशी जांभळाची ओळख असली तरी व्यावसायिकदृष्ट्याही त्याचे महत्व अधिक आहे. अनेक औषधांमध्ये याचा वापर केला जातो. त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना जांभळाच्या बीयांचा प्रक्रीया उद्योग सुरु करण्यास संधी आहे.