Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे?

प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे?

How should marketing be done when selling processed food products? | प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे?

प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे?

प्रक्रिया म्हणजे कोणत्याही शेती मालापासून खाण्यायोग्य पदार्थ बनविण्यासाठी करावी लागणारी कृती. गव्हाचे पीठ बनवणे, पिठापासून पोळी बनवणे ही झाली प्रक्रियेची सोपी उदाहरणे.

प्रक्रिया म्हणजे कोणत्याही शेती मालापासून खाण्यायोग्य पदार्थ बनविण्यासाठी करावी लागणारी कृती. गव्हाचे पीठ बनवणे, पिठापासून पोळी बनवणे ही झाली प्रक्रियेची सोपी उदाहरणे.

शेअर :

Join us
Join usNext

अनादी काळापासून स्त्रिया घरात व बाहेर कष्ट करीत आलेल्या आहेत. असे म्हणतात की शेतीचा शोधही महिलांनीच लावला आहे. आजही शेतीची ७०% कामे महिलाच करताना दिसतात. निंदणी, खुरपणी, वेचणी, कापणी, खत देणे, पोती भरणे, साठवणे, निवडणे, आणि माल बाजारात विकण्यापर्यंतची सर्व कामे स्त्रियाच बघतात. पाणी देणे, ट्रॅक्टर चालवणे, नांगरणे किंवा मालाची बाजारात नेऊन विक्री करणे इ. कामेच फक्त पुरुष करताना दिसतात.

परंतु शेतीतील एवढ्या कष्टावर भागणार नाही. कारण अनेकवेळा शेतीमाधेही चढ उतार असतो. निसर्गावर अवलंबून असणाऱ्यांवर तर नेहमी टांगती तलवारच असते. म्हणूनच प्रत्येकानेच शेतीपूरक जोडधंदा सुरु करून अर्थाजन करणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसायामध्ये गाई-म्हशी, शेळी पाळणे, कुक्कुटपालन असे व्यवसाय असोत किंवा शेती मालावरील प्रक्रिया उद्योग असोत ते करून त्यात पारंगत होऊन उद्योगाची भरभराट करणे आवश्यक आहे.

कोणता व्यवसाय करावा?
याचे सरळ व साधे उत्तर म्हणजे कोणताही व्यवसाय करावा पण तो अत्यंत निगुतीने करावा. ज्या कामात आपल्याला जास्त रस आहे असे वाटते किंवा आपण निष्णात आहोत असे वाटते असा कुठलाही व्यवसाय सुरु करण्यास हरकत नाही. उद्योग करताना तो फार मोठ्या भांडवलापासून करावा असे मात्र नाही. उद्योग अतिशय कमी भांडवलापासून सुरु केल्यास पैशाचा ताण कमी होतो. मालाचा दर्जा अत्यंत चांगला ठेवल्यास कोणताही व्यवसाय भरभराटीस जाण्यास उशीर लागत नाही. सध्या शेती पूरक व्यवसायामध्ये प्रक्रिया उद्योगास प्रचंड प्रमाणात मागणी आहे. परदेशात ८०% शेतीमालावर प्रक्रिया केली जाते तर भारतात फक्त २-४% शेती मालावर प्रक्रिया केली जाते. यावरूनच या उद्योगास आपल्या देशात किती वाव आहे हे लक्षात येईल. 

प्रक्रिया म्हणजे कोणत्याही शेती मालापासून खाण्यायोग्य पदार्थ बनविण्यासाठी करावी लागणारी कृती. गव्हाचे पीठ बनवणे, पिठापासून पोळी बनवणे ही झाली प्रक्रियेची सोपी उदाहरणे. या शिवाय प्रक्रिया उद्योगाचे इतर उदाहरणे द्यायची झाल्यास कांदा-लसून पेस्ट करणे, चिंचेचा गर करणे, भाज्यांच्या पावडरी बनवणे, आवळा व इतर फळे यांच्या वरील प्रक्रिया, विविध प्रकारची पीठे, भाजणी, तिखट, हळद पावडर, सुपाऱ्या, मसाले बनविणे इ. सुरवातीला आपण स्वतः ज्या गोष्टीत निष्णात आहात असे आपणास किंवा इतरांस वाटते उदा. कुरुड्या, पापड्या, पापड, पुरणपोळी, दुध-दह्याचे पदार्थ, लोणची, बाकरवडी इ. अशा प्रकारचे पदार्थ बनविण्यास करण्यास हरकत नाही.

महाराष्ट्राला एक मोठी खाद्य परंपरा आहे. ईडली, डोसा, बर्गर, पंजाबी डीशेस, नुडल्स जशी लोकप्रिय आहेत तशीच वडापाव, पोहे, कांदा भजी, आप्पे, पुरणपोळी, खवा, बर्फी, बेसन, तीळ-पोळी, मिसळ, शेवपुरी, कोकम सरबत, लिंबू सरबत, आमरस, आंबापोळी, आंबा बर्फी तसेच, मोदक, शंकरपाळे, चिवडा, पोहे इ. अशी महाराष्ट्रातील अनेक लज्जतदार पदार्थ आठवून पहा. माणसाच्या यशाचा मार्ग जातो तोच मुळी पोटातून. म्हणुन चवीचे मार्केटिंग करा. 

व्यवसाय कोणी करावा?
या प्रश्नाचे उत्तरही वरीलप्रमाणे कोणीही करावा असेच आहे. कारण व्यवसायात लिंगभेद करण्याची गरज नाही. व्यवसाय निवडी नंतर तो स्त्री असो की पुरुष कोणीही करू शकतो. कोणत्याही व्यवसायाच्या अत्युच्च शिखरावर आपणास स्त्री अथवा पुरुष दोघेही स्थिरावलेले दिसतात. स्वयंपाकघरावर अधिराज्य करणाऱ्या स्त्रिया जरी असल्या तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल्स मध्ये अतिशय रुचकर खाद्य पदार्थ बनविणारे शेफ, स्वयंपाकी आहेत. तर खास पुरुषांची मक्तेदारी असणारे व्यवसाय उदा. इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल्स यासारख्या क्षेत्रात स्त्रियाही अग्रगण्य स्थानी आहेत.

मार्केटिंगचा फंडा
कोणताही उद्योग सुरू करावयाचा म्हंटल्यास त्यास मार्केटिंग मिळेल का नाही याची सर्वांना सुरवातीला भीती वाटते. पण ही भीती मनातून काढली पाहिजे. निर्मिती, पॅकिंग व मार्केटिंग अशा प्रकारचे सूत्र आपल्याला कोणत्याही उद्योगात दिसून येते. परंतु त्याच प्रमाणे मार्केटिंगची बाजू शेवटी असतेच असे नाही. कारण व्यवसाय निश्चिती झाल्या नंतरच सुरवातीलाच निर्मिती ऐवजी आपल्या मालास मार्केटिंग कोठे मिळेल हे पाहणे गरजेचे असते.

सुरवातीला अत्यंत कमी प्रमाणात उत्पादन घेऊन त्यासाठी मार्केटिंग मिळते का हे पाहणे गरजेचे असते. किंबहुना आम्ही अशा प्रकारची प्रॉडक्टची निर्मिती करीत आहोत तो तुमच्या दुकानात ठेऊ शकतात का? व त्या वरील तुमचे प्रॉफिट घेऊन तुम्ही ते विकू शकता का? असे म्हणून मोठमोठ्या शहरातील नामांकित ३/४ दुकाने पाहून ठेवा. त्या नंतर स्वतः घरोघरी प्रॉडक्टचे काही सॅम्पल फ्री, काही कमी किमतीत विकण्याची तयारी ठेवा. शक्य असल्यास जाहिरात द्या. पैसे कमी असल्यास कष्टाची तयारी ठेवा.

घरातील प्रत्येक सदस्यांना व्यवसायात सहभागी करून घ्या. म्हणजे व्यवसायातील चढउतार त्यांना सुरवातीपासूनच अभ्यासता येतील ग्राहकाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. पदार्थ आवडला का नाही किंवा त्यात काही सुधारणा हव्यात का हे त्यांना निसंकोचपणे विचारा. बदल स्वीकारा, बदल करा, पुन्हा ग्राहकांपर्यंत जा. एक वेळा, दोन वेळा, तीनवेळा नव्हे अनेक वेळा असे करा. एकदा का तुमचा प्रॉडक्ट ग्राहकांच्या मनात उतरला की मग त्याच्या दर्जा बाबत तडजोड करू नका. पदार्थाचा दर्जा घसरला की तो पदार्थ ग्राहकाच्या मनातून उतरतो. म्हणून त्याच्या दर्जा बाबत/क्वालिटीशी तडजोड कधीही करू नका.

व्यवसायात प्रचंड यश मिळविण्यासाठी उद्योजकाकडे नीटनेटकेपणा, काटकसर, कला, वक्तशीरपणा, सचोटी, गोड बोलणे, रागाला आवर, हिम्मत न हरणे, चिकाटी इ. गुण असणे आवश्यक असते. लक्षात ठेवा मोठमोठ्या शहरात दर्जेदार मालास प्रचंड मागणी आहे. म्हणुन एकदा मार्केट मिळाल्यास ते पकडून ठेवण्याची क्षमता बाळगा. व्यवसाय भरभराटीत असताना कुठल्याही कारणाने माघार घेऊ नका. मार्केटिंग मधील कच्चे व पक्के दुवे शोधा. पुढे तो व्यवसाय जोमाने नेण्याची तयारी ठेवा व यशस्वी व्हा.

साधना उमरीकर
विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, खामगाव

Web Title: How should marketing be done when selling processed food products?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.