नाचणी, वरई, राळा, बर्टी, कोडो आणि चीना या तृणधान्य पिकांच्या आवरणामध्ये मोठ्या प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात. मानवी शरीरात या टणक आवरणाचे पचन होत नाही. परंतु या सर्व तृणधान्य पिकांचे पौष्टिक महत्व लक्षात घेता या धान्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. याबाबतच्या विविध प्रक्रिया पद्धती व त्यांची आवश्यकता खालीलप्रमाणे आहे.
भुसा असलेले भरडधान्य पिके (नाचणी, वरई, राळा, बर्टी, कोडो आणि चीना) मानवी वापरासाठी योग्य बनवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात साफसफाई, प्रतवारी आणि भुसे काढण्यापासून होते. भरडधान्य प्रक्रिया दोन भागात केली जाते त्यात प्राथमिक प्रक्रिया म्हणजेच काढणीनंतर धान्य खाण्यायोग्य करण्यासाठीची प्रक्रिया (फक्त छोट्या मिलेटसाठी) आणि दुसरी म्हणजे खाण्यायोग्य धान्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविणे.
भरडधान्यांची पिके खूप काटक असतात. त्यांच्या बियांची रचना पहिली तर त्यावर असणारे आवरण आतील भागास संरक्षण आणि त्याची टिकवणक्षमता वाढवत असते. इतर पिकांसारखे भरडधान्य काढणी केल्यानंतर व मळणी व स्वच्छता करून आपण खाऊ शकत नाही यासाठी आपणाला त्यावर प्राथमिक प्रक्रिया करून म्हणजे त्यावरील आवरण काढून त्याला खाण्यायोग्य करावे लागते यासाठी डीहलिंग व डीहस्किंग अशा प्राथमिक प्रक्रिया करणे गरजेचे असते आणि नंतर आपण ते स्वच्छ व प्रतवारी करून त्यापासून विविध पदार्थ बनवून खाऊ शकतो.
दुय्यम प्रक्रियेचा विचार केला तर मिलेट पिकांना सुपर फूड, पौष्टिक धान्य असे संबोधले आहे. यातील पोषणमूल्यांचे प्रमाण आणि आरोग्यास हितावह पोषक घटक उत्तम प्रमाणात आहेत त्यामुळे यावर प्रक्रिया करण्यास खूप वाव आहे. तस पहिला गेल तर आपल्या गृहिणी विविध पाककृती बनवीत असतातच पण आपल्याला उत्तम टिकवणक्षमता असणारे आणि पौष्टिक प्रक्रियायुक्त पदार्थ बनविणे आवश्यक आहे आणि हे ह्या भरडधान्यांपासून शक्य आहे.
यात नाचणीपासून आपण असंख्य प्रक्रियायुक्त पदार्थ यात लाडू, बिस्किटे, सत्व, पीठ, केक, पापड इत्यादी. तसेच पाककृतीत भाकरी, लापशी, डोसा, आंबील, शेवया, ढोकळा, उत्तपा, आप्पे, खीर, पेज इत्यादी पदार्थ बनवू शकतो.
आपल्या इंद्रियांचा स्मृतीशी जवळचा संबंध आहे. मग ती आपली दृष्टी असो, आवाज असो, वास असो, चव असो, स्पर्श असो, आपल्या संवेदना भूतकाळातील आठवणी आठवू शकतात आणि ताज्या करू शकतात. भरडधान्यांच्या विविध पाककृती तयार करून स्वाद घ्या आणि एक संस्मरणीय अनुभव जतन करा. भरडधान्य (मिलेट) पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतात आणि तुम्हीही यात नवीन शोध नवीन पाककृती तयार करू शकाल. भरडधान्यांचा समृद्ध वारसा आणि क्षमता शोधण्याची ही वेळ आहे.