शुद्ध व दर्जेदार बियाणे हा पीक उत्पादनाचा प्रमुख घटक आहे. पिकाचे उत्पादन मुख्यतः बियाण्याच्या दर्जावर व गुणधर्मावर अवलंबून असते. उत्तम उगवण शक्ती, रोग व कीड विरहीत, जोमाने वाढणारे व भौतिकदृष्ट्या शुद्ध बियाणे ही अधिक उत्पादनासाठी पहिली महत्त्वपूर्ण पायरी आहे.
बीजोत्पादन, बीजप्रक्रिया, बीजपरीक्षण, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, साठवण पॅकिंग आणि विक्री यामध्ये योग्य ती काळजी घ्यावी लागते. सोयाबीनच्या वाढत्या बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर दर्जेदार बियाणे तयार केले तर त्याचा फायदा फक्त त्यांनाच नाही तर इतर शेतकऱ्यांना देखील होईल. शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी काढणीपासून ते पेरणी पर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सोयाबीन बियाण्याचे आवरण (सीड कोट) हे अत्यंत पातळ व नाजूक असल्यामुळे बाकी पिकाच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर व जास्त प्रमाणात खराब होऊन उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो. सोयाबीनची कापणी, मळणी, प्रक्रिया व साठवणुकी दरम्यान खालील प्रमाणे काळजी घेतल्यास बियाण्याची उगवणशक्ती चांगली ठेवता येईल.
बियाणे प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी१) बियाणे प्रक्रिये दरम्यान जास्त तापमानापासून बियाण्याला वाचविण्याकरिता व बियाण्याला कमीत कमी इजा होण्याच्या दृष्टीने दरवर्षी बियाण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यापर्यंत आटोपावी.२) सोयाबीन बियाण्याला कमी इजा होण्याकरिता आणि उगवणशक्ती चांगली राहण्याकरिता बियाणे प्रक्रिया करताना इनक्लाईड बेल्ट कन्व्हेअरचा उपयोग करण्याची शिफारस विद्यापीठाद्वारे करण्यात आली आहे.३) बियाणे प्रक्रियेनंतर बियाण्याचा प्रातिनिधिक नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत बीज परीक्षणाकरिता पाठवावा.
अधिक वाचा: वैयक्तिक विहीर व बागायती लागवड योजनेसाठी कुठे कराल अर्ज?
साठवणूक दरम्यान घ्यावयाची काळजी१) बियाणे साठवणुकी पूर्वी त्यामधील काडीकचरा, फुटलेले बियाणे, कीड लागलेले बियाणे, अपरिपक्व बियाणे इ. चाळणी मारून साफ करावे.२) प्रतवारी मशीनच्या सहाय्याने ३.६ मि.मी. (स्लॉटेड) आकारमानाची चाळणी वापरून बियाणे प्रतवारी करूनच साठवावे.३) बियाणे साठवणी दरम्यान बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्के पेक्षा जास्त नसावे. त्याकरिता ओलावा मापक यंत्राच्या (Moisture meter) सहाय्याने बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण तपासून घ्यावे. बियाण्यामध्ये ओलावा जास्त असेल तर सावलीमध्ये वाळवून ओलाव्याचे प्रमाण १२ टक्के पेक्षा कमी करावे व नंतर नवीन पोत्यात भरावे.४) सोयाबीन बियाणे नाजूक असल्यामुळे हाताळणी करताना तीन फुटापेक्षा जास्त उंचीवरून टाकू/आदळू नये व पोत्यांची थप्पी पाच फुटापेक्षा जास्त उंच लावू नये.५) बियाणे साठवताना पोते भिंतीपासून कमीत कमी तीन फूट दूर व खाली लाकडी फळ्या किंवा प्लॅस्टिक ब्लॉग्स वर ठेवावे.६) बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा परंतु त्यासाठी कूलरचा वापर करू नये. अन्यथा बियाण्याची आर्द्रता वाढेल व त्यामुळे बियाणे खराब होऊ शकते.७) आवश्यकतेनुसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास कीडनाशकांची फवारणी करावी.८) सोयाबीनचे बियाणे अतिशय नाजूक असते. थोड्यासुद्धा मारामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते. विशेषकरून जेव्हा सोयाबीनचे पोते वाहतुकी दरम्यान वरून खाली फेकले जाते तेव्हा बियाण्याला आतून इजा होते. ५ फुटापेक्षा जास्त उंची वरून सोयाबीनचे बियाणे खाली पडले तर बियाण्याची उगवणक्षमता घटते त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या वाहतूक व साठवणुकी वेळी बियाण्याचे पोते जोराने किंवा जास्त उंची वरून जमिनीवर आदळू नये.
अशा प्रकारे सोयाबीन बियाण्याचा दर्जा उत्तम राखण्यासाठी वरील बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे बियाण्यास बाजारात जास्तीत जास्त भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पेरणीसाठी शुद्ध व दर्जेदार बियाणे काहीही धावपळ न करता वेळेवर उपलब्ध होईल.
प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला