उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरात सध्या गूळ उत्पादन अंतिम टप्प्यात आला असून, अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उसाचे गाळप करण्याकडे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
हाळी हंडरगुळी परिसरात तिरू प्रकल्प असल्याने ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ऊस उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. नवीन ऊस लागवड पाण्याअभावी थांबली आहे. शेतातील ऊस बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. कारखाने ६९१, ८६०३२, ९२०१० या जातीच्या उसाला प्राधान्य देत असल्याने इतर जातींच्या उसाचे गूळ उत्पादन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हाळी हंडरगुळी परिसरात दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत गूळ उत्पादन सुरू असते. सध्या या परिसरात गूळ उत्पादन अंतिम टप्प्यात आले असून, तुरळक ठिकाणी गुन्हाळे सुरू असल्याचे चित्र हाळी हंडरगुळी परिसरात पाहावयास मिळत आहे.
ऊस गाळप करण्याकडे शेतकऱ्यांचा कल...
सध्या वातावरणातील बदलामुळे अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे गूळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशात मजुरांची टंचाई होत असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. मान्सूनपूर्व मशागतीची कामे सुरू होत असल्याने ऊस गाळप करण्याकडे शेतकऱ्यांची मानसिकता वळली आहे.