बाजारात कापसाला दर कमी त्यात यंदा अवघ्या दोन ते तीन वेचणीत कापूस पिकाच्या केवळ पर्हाट्या शिल्लक राहिल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झाले आहेत. अशावेळी शेतकरी कपाशीला पुन्हा पाणी देऊन फरदड घेतात. मात्र यामुळे विविध किडिंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
त्यामुळे फरदड न घेता शेतकऱ्यांनी कपाशीच्या अवशेषांपासून विविध उत्पादने तयार केली तर निश्चितच अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच शेतकरी गटाने हा प्रक्रिया उद्योग सुरू केला, तर यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ होऊ शकतो.
कपाशीच्या अवशेषांपासून तयार होणारी उत्पादने (Value addition of cotton residues)
विटा (ब्रिकेट्स) आणि कांडी पॅलेट्स : टाकाऊ म्हणून जाळणाऱ्या पर्हाट्यांपासून विटा आणि कांडी (पॅलेट्स) बनविण्यात आले आहेत. या पॅलेट्सचा वापर एलपीजी गॅसला पर्यायी इंधन म्हणून करता येतो. तर विटांचा वापर साखर, कागद, रबर, रासायनिक आणि प्रक्रिया उद्योगातील बॉयलरमध्ये केला जातो. ढाबे व रेस्टॉरंटमधील भट्ट्या आणि शेगड्यांमध्ये इंधनासाठी कांड्यांचा वापर होतो. साध्या पर्हाट्या जाळण्याच्या तुलनेत ब्रिकेट्स किंवा पॅलेट्स यांची ज्वलन कार्यक्षमता अधिक आहे. परिणामी, एलपीजी गॅसच्या तुलनेत काडींच्या वापरामुळे इंधन खर्चात ५०% ने अधिक बचत होत असल्याचे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबईचे निरीक्षण आहे.
पार्टिकल बोर्ड : कपाशी परट्यांपासून पार्टिकल बोर्ड आणि अॅक्टिव्हेटेड कार्बन तयार करण्यात आले आहे. गृह सजावट, भिंतीचे पॅनलिंग, फॉल्सलिंग, टेबल टॉप अशा फर्निचर साठी पार्टिकल बोर्डचा वापर करता येतो. तर अॅक्टिव्हेटेड कार्बनचा वापर हवा आणि पाण्याच्या शुद्धीकरणासाठी होतो.
दर्जेदार सेंद्रिय खत
पर्हाट्यांवर जैविक घटक आणि एनपीकेची मात्रा देऊन कुजवण्याची (कंपोस्टिंग) सुधारित व जलद प्रक्रिया विकसित केली गेली आहे. पर्हाट्या नुसत्याच कंपोस्ट होण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, या सुधारित प्रक्रियेमुळे कंपोस्टिंग केवळ तीन महिन्यात शक्य होत असल्याने दोन महिन्याची बचत होते आहे. पर्हाट्यांच्या टाकाऊ अवशेषांपासून बनविलेले हे कंपोस्ट खत सेंद्रिय खताचा उत्तम पर्याय आहे.
माहिती सौजन्य : केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई
हेही वाचा : Health Benefits of Tamarind : अबब केवळ एका चिंचेचे किती 'हे' आरोग्यदायी फायदे