नाशिक : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपत आला आहे. जिल्ह्यात सध्या फक्त कादवा सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरू असून, त्याचे गाळपाचे १४० दिवस पूर्ण झाले आहेत, तर द्वारकाधीश, रानवड, रावळगाव व नाशिक येथील कारखान्यांचे गाळप नुकतेच संपले आहे. हे पाच साखर कारखाने मिळून २० मार्च २०२४ अखेर जवळपास १० लाख ५८ हजार २३८ क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. साखर उतारा १० ते ११ टक्के आहे. साखर उत्पादनात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी कादवा सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल ठरला आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात सर्वांत प्रथम शेवरे, ता. सटाणा येथील द्वारकाधीश या खासगी साखर कारखान्याने दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉयलर पेटवले. दैनंदिन ४००० मेट्रिक टन गाळपक्षमता असलेल्या द्वारकाधीश साखर कारखान्याने दि. २२ मार्च २०२४ अखेर ३,१६,८३५ हेक्टर उसाचे गाळप केले आहे. रावळगाव, ता. मालेगाव येथील एस. जे. शुगर डिस्टिलरी अँड पॉवर प्रा. लिमिटेडच्या साखर कारखान्यानेही सर्वांत उशिरा म्हणजे १५ नोव्हेंबरला बॉयलर पेटवत १ लाख ३० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करत साखरेचे उत्पादन घेतले आहे. रावळगाव कारखान्याचा साखर उतारा ८.६५ टक्के आहे.
तसेच रानवड साखर कारखाना आमदार दिलीप बनकर यांच्या पुढाकाराने स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने भाडे तत्वावर घेतला आहे. रासाकाचा गळीत हंगाम सहा नंबर 2023 रोजी सुरू झाला. राज्यात या हंगामात 20 मार्चअखेर बारा कोटी मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा एक उतारा 10.1% आहे. तर यंदा जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे गाळप मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने महिनाभर अगोदर संपले.
दर चांगला निघण्याची आशा
कादवा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू शकतो. कार्यक्षेत्रातील ऊस वापराबरोबरच बाहेरूनदेखील ऊस मागवण्यात आला. यंदा रिकव्हरी चांगली असल्यामुळे दरही चांगला निघेल, अशी अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बऱ्यापैकी चांगली स्थिती असल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळप झाला आहे.