नाशिक : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने देशातील अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. प्रक्रिया उद्योगांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने गत आर्थिक वर्षात अनेकांना रोजगाराच्या वाटेवर नेऊन सोडले आहे. त्यात रिकाम्या हातांना काम मिळाले आहे. या योजनेसाठी गतवर्षी नाशिक (Nashik) जिल्ह्याकरिता ८ ते १० काेटी रुपये दिले आहेत. त्यानुसार येत्या वर्षात जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येणार आहे.
काय आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना?
आत्मनिर्भर अभियानांतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात व्होकल फॉर लोकलच्या भावनेला चालना देण्यासाठी जून २०२० मध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना सुरू केली. या योजनेसाठी २०२० ते २०२५ या कालावधीसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठीची ही पहिलीच सरकारी योजना असून या योजनेअंतर्गत उद्योगांना लाभ दिला जाणार आहे.
कर्ज कशासाठी मिळते?
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सरकारतर्फे ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. योजनेच्या सबसिडीनुसार प्रकल्पाचा जो खर्च असेल त्याच्या ३५ टक्के कर्ज मिळू शकते. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रॉडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामायिक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन व उद्योगवाढीसाठी लाभ मिळवून देणे.
कोठे करायचा अर्ज?
या योजनेच्या कार्यालयीन वेबसाईटवर जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर सर्व अर्जाची जिल्हा समितीद्वारे छाननी करण्यात येते. जिल्हास्तरावर असलेल्या शासनाच्या उद्याेग विभागात योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
वर्षभरात १० कोटींचे वाटप
प्रक्रिया उद्योगासाठी जिल्ह्यात वर्षभरात ८ ते १० कोटींचे वाटप झाले. २०२३-२४ ला जिल्ह्यासाठी होते ५०० उद्योगांचे उद्दिष्ट. त्यापैकी अनेक उद्योगांना चालना मिळाली आहे. योजनेचे उद्दिष्ट गाठण्यात जिल्हा प्रयत्नशील असून त्यामुळे उद्योगवाढीचा टक्का समाधानकारक असल्याचे सांगण्यात येते. ही योजना सुरू झाल्यापासून अनेक बचत गटांनाही लाभ मिळाला आहे.
कधीपर्यंत करायचा अर्ज?
ही योजना २०२० ते २०२५ या पाच वर्षात राबविली जाणार आहे. प्रारंभी एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर योजनेची अंमलबजावणी सुरू होती. योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक उद्योगांना विकास साध्य करता आला असून अनेकांच्या उद्योगांची व्याप्ती वाढल्याने त्यांनीही रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. लवकरात लवकर प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज करावा लागेल.