Join us

ना आंब्याचं, ना लिंबूंचं, असं बनवलं जातंय बांबूचं लोणचं, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 09:42 IST

नाशिकमध्ये सध्या कृषी महोत्सव सुरु असून या प्रदर्शनात बांबूचे लोणचे भाव खाऊन जात आहे.

आतापर्यंत आपण आंब्याचे, लिंबूचे, लसणाचे लोणचे, आवळ्याचे लोणचे असे विविध प्रकार पाहिले असतील. मात्र रानात, शेतात उगवणाऱ्या बांबूंपासून देखील उत्कृष्ट असे लोणचे बनविले जात असून ते चवीनं खाल्लंही जात आहे. विशेष म्हणजे बांबूच्या लोणच्याचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने ते शरीरासाठी देखील उत्तम असल्याचे बांबु लोणचे उत्पादक असलेल्या आदिवासी महिला उद्योजकांनी सांगितले. 

नाशिकमध्ये सध्या कृषी महोत्सव सुरु असून या प्रदर्शनात बांबूचे लोणचे भाव खाऊन जात आहे. पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक महिला बांबूचे लोणचे  तयार करत असून ते विक्रीसाठी प्रदर्शनात आणत आहेत. ग्रामीण भागात असलेल्या रानमेव्यापासून रोजगाराचे साधन म्हणून उपलब्ध होऊ लागले आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे बांबू. खरं तर बांबू सध्याच्या घडीला अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडत आहे. मागणी वाढत असल्याने अनेक भागात बांबूंची शेती देखील केली जात आहे. यासाठी शासनाकडून विशेष अनुदानही दिले जात आहे. याच कोवळ्या बांबूपासून लोणचे बनविले जात असून ते अनेकांच्या पसंतीस पडत आहे. 

पेठ तालुक्यातून आलेल्या भाग्यलक्ष्मी बचत गटाच्या रेखा जाधव म्हणाल्या की, आम्ही या कोवळ्या बांबूची भाजी करत असू. आमच्याकडे लोणचे म्हटलं तर आंब्याचे केले जाते. मात्र बांबूपासून लोणचं बनवून पाहायचं ठरलं आणि आम्ही यात यशस्वी देखील झालो. त्यानंतर हळूहळू नातेवाईक, मित्रमंडळी यांना हे बांबूचं लोणचं चवीसाठी दिले. त्यांच्याकडून अतिशय चांगली प्रतिक्रिया आल्यानंतर आम्ही हे लोणचं बाजारात आणलं. शिवाय हे लोणचं वर्षभर टिकतं. आज ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांचा देखील चांगला रिस्पॉन्स असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

बांबूचं लोणचं कसं बनवलं जात? 

साधारण लोणचं बनवण्यासाठी बाबूंच्या वरील मऊ भागाचा वापर केला जातो. जो कि सुरवातीच्या वेळी कोवळ्या स्वरूपात असतो. या कोवळ्या भागाचे कापून त्याचे लहान-लहान तुकडे एका मीठ टाकून भांड्यात झाकून ठेवले जातात. काही तासानंतर बांबूचे निघालेले पाणी भांड्यातून काढून टाकले जाते. हि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बांबूचे तुकडे चांगले वाळवले जातात. वाळल्यानंतर लोणची बनवण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यानंतर वाळलेल्या बांबूंच्या छोट्या छोट्या तुकड्यांना मसाला लावून बांबूचे लोणचं तयार केलं जातं. 

 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकशेतीबांबू गार्डनआंबा