आज रांची येथे देशातील पाचव्या आणि पूर्व विभागातील पहिल्या अत्याधुनिक मोठ्या मध चाचणी प्रयोगशाळेचे उदघाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि आदिवासी कार्य मंत्री अर्जुन मुंडा यांच्या माध्यमातून पार पडले. या मध चाचणी प्रयोगशाळेबरोबरच एकात्मिक मधमाशी पालन विकास केंद्र, बांबू लागवड प्रकल्प आणि इतर प्रकल्पांची पायाभरणी देखील करण्यात आली.
कृषि क्षेत्रात मधाला अनन्यसाधारण महत्व असून त्यामुळे शेतकरी मधमाशी पालनाकडे वळू लागले आहेत. दरम्यान त्याचबरोबर इतरही क्षेत्रात मध उपयुक्त आहे. म्हणूनच मधाची गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळा असणे महत्वाचे आहे. या हेतूने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सध्या NDDB आनंद (गुजरात), IARI पुसा दिल्ली, IIHR बेंगळुरू आणि IBDC हरियाणा येथे अशा प्रयोगशाळा आहेत. आता रांचीमध्ये नवीन प्रयोगशाळेच्या उभारणीमुळे, पूर्व भारत मध केंद्र म्हणून विकसित होईल. मध उत्पादकांना देशांतर्गत बाजारपेठेत विस्तार आणि निर्यातीची संधी मिळेल आणि त्यांची प्रगती होईल.
यावेळी मंत्री मुंडा म्हणाले की, मध उत्पादनासाठी हे क्षेत्र मोठे असले तरी या भागातून कधीही मधाची निर्यात होत नाही. ते म्हणाले की, परिसरात मध उत्पादनाची मोठी क्षमता असून, त्याचा उपयोग शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्हायला हवा. प्रदेशातील सुमारे 30 टक्के जमीन जंगलाने व्यापलेली आहे, ज्यामध्ये मुबलक पिके, फळे, भाज्या आणि जंगली झाडे आहेत, जे मध उत्पादनासाठी सर्वात महत्वाचे स्त्रोत आहेत. तसेच देशात मधाचे उत्पादन वाढत असून त्याची निर्यातही वाढत आहे. मध चाचणी प्रयोगशाळा उत्पादित मधाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यास मदत करतील. मधमाश्यांच्या पेटी निर्मिती युनिटमुळे मध उत्पादन वाढण्यास मदत होईल.
बांबू मिशन प्रकल्पही सुरू
ते पुढे म्हणाले की ट्रेडिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग युनिट्समुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मधाच्या विक्रीला चालना मिळण्यास मदत होईल आणि मधमाश्या पाळणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि झारखंड हे गोड क्रांतीचे केंद्र बनेल. 1940 ते 1960 या काळात देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यानंतर हरितक्रांती आली आणि त्यानंतर देशात अन्नधान्य उत्पादन वाढले. उत्पादन वाढले, पण मातीची धूपही झाली. 2013 नंतर मातीचे आरोग्य, पर्यावरण यासह अनेक बाबतीत आपण सतर्क झालो आहोत. निसर्गाशी नाते निर्माण करताना मातीची हानी न करता माणसाला पुढे जायचे आहे. परिसरात बांबू मिशन प्रकल्पही सुरू होत असल्याचे म्हणाले.