Join us

Nagali Ladu : नागलीच्या लाडूंना मागणी वाढली, असे बनवा घरच्या घरी नागलीचे लाडू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:14 IST

Nagali Ladu : नागली पिकाचे उत्पादन घटत चालले असून दुसरीकडे पदार्थ बनविण्याकडे कल वाढला आहे.

गडचिरोली : अलीकडे नागली पिकाचे उत्पादन (Ragi Crop Production) खूपच कमी झाले असून नागलीसह इतर मिलेट्सची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागात काही निवडक कुटुंबांकडेच नागली आढळून येत आहे. मात्र दुसरीकडे नागलीपासून विविध पदार्थ बनविण्याकडे कल वाढला आहे. यामुळे अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. 

आयुर्वेदात नागलीला (Nagali) प्रचंड महत्व असून नाचणी थंड असते आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. नाचणीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे तृप्ती वाढवण्यास मदत करते. नाचणी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त असते. नाचणी लाडू पौष्टिक आणि आरोग्यासाठी उत्तम असतात. आबालृद्धांसाठी हे लाडू पौष्टिक आहेत. 

सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या गोड पदार्थासाठी हे लाडू उत्तम पर्याय आहेत. जिल्ह्यात नाचणीचे उत्पादन (Nagli Production) होत नव्हते. परंतु आता कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बियाणे वाटप केली जात असल्याने अनेक शेतकरी नाचणीची लागवड करतात. याशिवाय बाजारातून खरेदी करून नाचणीपासून विविध पदार्थ बनवता येतात.

पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्यदोन कप नाचणी पीठ, एक कप गूळ (किसलेला), अर्धा कप तूप, अर्धा कप सुकामेवा (बदाम, मनुका, काजू, पिस्ता - चिरलेले), दोन टे. स्पून खसखस, दोन टे.स्पून खोबरं (किसलेले), एक टि.स्पून वेलदोडा पूड

पदार्थ बनविण्याची कृती

  • एका कढईत तूप गरम करून त्यात नाचणी पीठ मंद आचेवर भाजून घ्यावे, तोपर्यंत भाजा जोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही आणि रंग हलका बदलत नाही. 
  • दुसऱ्या कढईत १-२ चमचे तूप गरम करून त्यात खसखस, खोबरं आणि सुकामेवा हलकं खरपूस भाजून घ्यावे.
  •  त्यानंतर त्यात किसलेला गूळ घालून मंद आचेवर गूळ विरघळू द्या. गूळ पूर्णपणे वितळला की गॅस बंद करावा. 
  • भाजलेलं नाचणी पीठ गुळाच्या मिश्रणात घालून नीट एकत्र करा. त्यात वेलदोड्याची पूड घालून मिसळावे. 
  • मिश्रण थोडं कोमट झाल्यावर हाताने लाडू वळा. 
  • लाडू पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवावे. 
  • अशा पध्दतीने नाचणीपासून पौष्टिक लाडू तयार करता येतात. हे लाडू चवदारही असतात.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीव्यवसायनाचणी