Join us

Nashik : पिंपळगावच्या बेदाण्याला जगभरातून मागणी वाढलीय, नेमकं कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:54 AM

उत्कृष्ट दर्जा, चांगली चव, मोठा आकार आणि जीआय मानांकन, यामुळे पिंपळगावच्या बेदाण्याला जगभरातून मोठी मागणी आहे.

- गणेश शेवरे

उत्कृष्ट दर्जा, चांगली चव, मोठा आकार आणि जीआय मानांकन, यामुळे पिंपळगावच्या बेदाण्याला जगभरातून मोठी मागणी आहे. परकीय देशांच्या कसोट्यांना उतरून हा बेदाणा लोकप्रिय होत असून, सन २०३० पर्यंत देशातील सर्वाधिक द्राक्ष व बेदाणा निर्यात करणारा जिल्हा अशी ओळख नाशिकला प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

नाशिक जिल्हा हा द्राक्ष, बेदाण्याचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. दोन वर्षे कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा परिणाम शेती उत्पादनांवरही झाला. मात्र, शेतकऱ्यांच्या कौशल्याने द्राक्षाची बाजारपेठ दोन वर्षानंतर पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोनाकाळात परदेशात जाणारी द्राक्षे तेथे जाऊ न शकल्याने व स्थानिक बाजारपेठेतही विकली न गेल्यामुळे शेतकरीही या बेदाणा व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता या उद्योगातील स्पर्धा वाढल्याने अधिक चांगला दर्जा देण्याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे.

दरम्यान आगामी चार पाच वर्षात जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाण्याला निर्यातीची मोठी संधी आहे. सन 2030 पर्यंत नाशिक जिल्हा सर्वाधिक द्राक्ष आणि बेदाणा निर्यात करणारा असेल, असे मत द्राक्ष व बेदाणातज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यावर्षीचा द्राक्ष हंगाम द्राक्ष उत्पादक शेतक-यांसाठी समाधानकारक ठरला असून, एकरी उत्पादन वाढल्याचे शेतकरी सांगत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी असूर दर मात्र समाधानकारक मिळत नाही. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचा दर्जा, गोडी, रंग अतिशय चांगला असल्याने आगामी २०३० पर्यंत सर्वाधिक द्राक्षे नाशिक जिल्ह्यातून निर्यात होतील, यात काही शंका नाही. 

बेदाण्याला जीआय मानांकन 

नाशिकच्या बेदाण्याला जीआय नानांकन मिळाल्याने बेदाणा निर्यातीसाठी मोठी संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. जगातील बाजारपेठ जीआय मानांकनामुळे नाशिकच्या बेदाण्याचा जागतिक स्तरावर दबदबा आहे. कमीतकमी रासायनिक खते आणि औषधांचा वापर करून खर्च कमी करण्यावर शेतकऱ्यांनी आता भर दिला पाहिजे. रेसिड्यूमुक्त द्राक्षे आणि बेदाणे (सेंद्रिय) तयार करण्याचे आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकयांनी स्वीकारले पाहिजे, त्यासाठी द्राक्षबागातयदार संघाकडूनदेखील सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. निर्यातीतून होतोय मोठा फायदा यावर्षी नाशिक जिल्ह्यात बेदाण्याला समाधानकारक वातावरण असून, दरही चांगले मिळतील, अशी स्थिती आहे.

बेदाणा निर्मितीचे युनिट वाढले... 

२०१९ च्या तुलनेत कोरोनाकाळात द्राक्ष आणि बेदाण्याला दर कमी मिळाले असले, तरी सरासरी बेदाण्याचे दर चांगले आहेत. आज बेदाणा जगातील ६० देशांमध्ये निर्यात होतो आहे. दरवर्षी बेदाण्याची निर्यात वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. चार वर्षापूर्वी निर्यातक्षम बेदाणा तयार करण्याचे जिल्ह्यात केवळ एक युनिट होते. आज २० ते २५ युनिट उभी आहेत. बेदाण्याच्या निर्यातीचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. बेदाणा खरेदी-विक्री बहुतांशी बैंक धनादेश आरटीजीएस याद्वारे होत असल्याने नोटाबंदीचा परिणाम बेदाणा व्यवसायावर झाला नाही. मात्र, कोरोनाचा फटका बसला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेताच न आल्याने मोठ्या प्रमाणत बेदाणा जिल्ह्यात पडून राहिला व तो कवडीमोल विकण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली. मात्र, आता परिस्थिती सुधारत असून, आगामी पाच वर्षांमध्ये जगभर पिंपळगावच्या बेदाण्याचा डंका वाजताना दिसेल, असे चित्र आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीनाशिकद्राक्षेशेती क्षेत्र