Join us

यंदा साखर उत्पादनात द्वारकाधीश तर कादवा साखर कारखाना उताऱ्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 12:13 PM

नाशिक जिल्ह्यात यंदा कादवा सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल ठरला आहे.

नाशिक : जिल्ह्यात यंदा तीन सहकारी व दोन खासगी साखर कारखाना मिळून फेब्रुवारी २०२४ अखेर सुमारे ११८ दिवसांच्या गळीत हंगामात जवळपास १० लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. साखर उतारा ९.९२ टक्के आहे. गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, साखर उत्पादनात सहकारीऐवजी खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी कादवा सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल ठरला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात सर्वात प्रथम शेवरे, ता. सटाणा येथील द्वारकाधीश या खासगी साखर कारखान्याने दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉयलर पेटवले. दैनंदिन ४००० मेट्रिक टन गाळपक्षमता असलेल्या द्वारकाधीश साखर कारखान्याने दि. २७ फेब्रुवारी २०२४ अखेर ४ लाख ५४ हजार २२५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख १४ हजार १७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्याचा साखर १०.५३ टक्के आहे, त्याखालोखाल दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी गाळप सुरू झालेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याने २ लाख ७२ हजार ३६९ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 2 लाख 23 हजार 250 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 

मात्र, कादवाचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक 11.94 टक्के राहिला आहे. अजूनही कादवा आणि द्वारकाधीश या दोन कारखान्यांची चाके सुरू आहेत. जिल्ह्यातील ही दोन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असतानाच रावळगाव, ता. मालेगाव येथील एस. जे. शुगर डिस्टीलरी अँड पॉवर प्रा. लिमिटेडच्या साखर कारखान्यानेही सर्वांत उशिरा म्हणजे 15 नोव्हेंबरला बॉयलर पेटवत 1 लाख 6 हजार 920 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 94 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. रावळगाव कारखान्याचा साखर उतारा 8.65 टक्के आहे. 

रासाका-नासाकाची झुंज

जिल्ह्यातील रानवड साखर कारखाना आमदार दिलीप बनकर यांच्या 3 पुढाकाराने स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने भाडेतत्त्वावर घेतलेला आहे. रासाकाचा गळीत हंगाम 6 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू झाला. रासाकाने 85 हजार 39 मेट्रिक टन गाळप करत 83 हजार 600 क्चिटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्याचा साखर उतारा 9.9 टक्के आहे, तर अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल लिमिटेडने भाडेतत्त्वावर घेतलेल्या नाशिक साखर कारखान्याचा गळीत हंगाम 08 नोव्हेंबर 2023  रोजी सुरू झाला. या कारखान्याने 65 हजार 563 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 61 हजार 511 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलेले आहे. कारखान्याचा साखर उतारा 9.5 टक्के राहिला. उसाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हे दोन्ही कारखाने रडतखडतच चालले,

जिल्ह्याचा साखर उतारा 9.92 टक्के

राज्यात या हंगामात २७ फेब्रुवारी अखेर ८ कोटी ९४ लाख १८ हजार २७९ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ८ कोटी ही ९५ लाख ६ हजार ८४८ क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा एकूण उतारा १०.०१ टक्के आहे, तर जिल्ह्यातील पाचही कारखाने मिळून ९ लाख ८४ हजार ७७ मेट्रिक टन गाळप होऊन ९ लाख ७६ हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, तर जिल्ह्याचा साखर उतारा ९.९२ टक्के आहे.

गळीत हंगाम मार्च अखेरपर्यंत

कादवा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम हा मार्च अखेरपर्यंत चालेल अशी स्थिती आहे, कार्यक्षेत्रातील ऊस वापराबरोबरच बाहेरून देखील ऊस मागवण्यात आला. यंदा रिकव्हरी चांगली असल्यामुळे दरही चांगला निघेल, अशी अपेक्षा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बऱ्यापैकी चांगली स्थिती असल्याचे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले. द्वारकाधीश साखर कारखान्याचे एकूण चार लाख सत्तर हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे, कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळप झाला असून, कार्यक्षेत्रात नोंदणी झालेला फक्त पंधराशे ते दोन हजार मेट्रिक टन ऊस गाळप होणे बाकी आहे. तोही एक दिवसात गाळप करण्यात येईल, अशी माहिती द्वारकाधीश साखर कारखान्याचे शेतकरी अधिकारी सतीश सोनवणे यांनी दिली.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीऊससाखर कारखानेनाशिक