Join us

वर्षाला 34 लाख मेट्रिक टन तणसाचे उत्पादन, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रक्रिया उद्योग गरजेचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 3:39 PM

तणसीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना अच्छे दिन येऊ शकतात.

- कालीदास सूर्यवंशी

नाशिकसह पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. खरीप आणि रब्बी हंगामात जवळपास २५ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धान निघाल्यानंतर त्याची चूर्णी करून तणस आणि धान वेगळा केला जातो. काही तणसीचा उपयोग हा जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. पण, यानंतरही बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहते. पण, या तणसीचा उपयोग करण्यासाठी त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना ही तणस जाळून टाकावी लागते. त्यामुळे तणसीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना अच्छे दिन येऊ शकतात.

कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्व आले आहे. त्यामुळे शेतीत यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढत चालला आहे, तर दुसरीकडे पशुधनाची संख्याही कमी होत चालली आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होऊ लागला आहे. उत्पादनात होणारी घट ही महत्त्वाची बाब शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी ठरत आहे. यात तणसीची निरुपयोगिता भर घालत आहे. राज्यात ३४ लाख मेट्रिक टन तणसीची वाढती निरुपयोगिता चिंतनीय बाब ठरत आहे. तणसीवर प्रक्रिया करून प्रकल्प उभारणीची गरज निर्माण झाली आहे. 

राज्यात १५.१३ लाख हेक्टर क्षेत्राखाली भाताचे उत्पादन घेतले जाते, यातून राज्यात जवळपास ३४ लाख मेट्रिक टन भाताच्या धानाचे उत्पादन होते. मात्र, दिवसेंदिवस आधुनिकीकरण व यांत्रिकीकरणामुळे तणसीचा उपयोग कमी होऊ लागला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व अंशतः नागपूर जिल्ह्यात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते.

प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज

दरवर्षीं मोठ्या प्रमाणात तणस जाळण्यात येत असल्याने वायू प्रदूषणही होत आहे. याचा विपरित परिणाम म्हणून भविष्यात ग्रामीण क्षेत्रालाही पर्यावरणाच्या समस्यांना समोर जावे लागले, तर काही वावगे ठरणार नाही. म्हणून शासनाने तणसीवर प्रक्रिया करून उत्पादन निर्मितीसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणेसुद्धा शक्य होईल.

ताणसीची मागणी कमी 

एकीकडे यंदा पाऊस नसल्याने चाऱ्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच वैरण मोठ्या प्रमाणावर मागवली जात आहे. मात्र अलीकडे मशीनच्या साहाय्याने भात कापणीसह मळणी होत असल्याने मशिनमधून निघालेली तणस काहीच उपयोगात येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जनावरे देखील हे तणस खात नाहीत. तर दुसरीकडे तणसीवर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेतून निर्मिती होणाऱ्या साहित्यांमध्ये प्लास्टिकचा वापर होत असल्याने तणसीच्या मागणीतही घट आली आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीभातशेतकरीशेती क्षेत्र