Join us

उत्तर महाराष्ट्रात कादवाचा साखर उतारा ठरला अव्वल, चार लाख क्विंटल साखरेची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 12:31 PM

यंदा कादवाचा साखर कारखान्याने चार लाख शंभर क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याची प्रतिकूल परिस्थिती असतानाही गळीत हंगामाची यशस्वी सांगता होत ३ लाख २९ हजार ५८२ मे. टन उसाचे गाळप केले असून, सरासरी १२.२२ टक्के उतारा मिळाला आहे. कादवाचा साखर उतारा उत्तर महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे. कारखान्याने चार लाख शंभर क्विंटल साखर निर्मिती, तर ३ लाख ६३ हजार लिटर इथेनॉल व स्पिरीटची ३३ लाख लिटर निर्मिती केली आहे.

यंदा दुष्काळी स्थिती असल्याने उसाची उपलब्धता कमी होती. त्यातच ऊस तोड मजूर टंचाईने राज्यातील सर्वच कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कादवाने १४२ दिवसात गळीत हंगाम पूर्ण केला आहे. गळीत हंगामाची सांगता चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते गव्हाणीत नारळ टाकून झाली. यावेळी बोलताना श्रीराम शेटे यांनी हंगाम यशस्वी केल्याबद्दल सर्व अधिकारी, कामगार, ऊस उत्पादक, ऊस तोड कामगार, ऊस वाहतूकदार यांचे आभार मानत पुढील वर्षी जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. यंदा कारखान्याचा सर्वाधिक उतारा राहिल्याने चांगला भाव राहण्याची शक्यता असून, जास्तीत जास्त ऊस लागवड करावी व कादवाला ऊस पुरवठा करावा, असे आवाहनही शेटे यांनी केले.

कादवा कारखान्याने ऊस लागवड वाढावी, यासाठी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना उधारीने खत वाटप करण्यात येत असून, इफको १०-२६- २६ या खताची टंचाई असल्यामुळे १२-३२-१६ खताचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच कारखान्याने उच्च प्रतीचे कंपोस्ट खत निर्मिती केले असून, १,८९० रुपये प्रतिटन प्रमाणे उधारीने विक्री सुरू आहे तरी सभासदांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेत ऊस लागवड करावी, असे आवाहन केले आहे. यावेळी व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, संचालक मंडळ, सर्व विभागाचे खातेप्रमुख व कामगार उपस्थित होते.

साखर घेऊन जाण्याचे आवाहन 

कादवा कारखान्यातर्फे दिली जाणारी सवलतीची साखर नेण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. ३० एप्रिल असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यापूर्वी सभासदांनी आपली सवलतीच्या दरातील साखर घेऊन जावी, असे आवाहन कादवा प्रशासनाने केले आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीनाशिकऊससाखर कारखाने