गडचिरोली : 'होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी मातेला साखरेची गाठी 'असे ग्रामीण भागातील गाणे होळीच्या पर्वावर नेमक्या ऐकायला मिळते. होळी सणात साखरगाठीला मोठी मागणी असते. यात गाठीनिर्मितीतून स्थानिक कामगारांना एक महिना रोजगार मिळतो. त्यासाठी काही व्यावसायिक होळीचा सण येण्यापूर्वीच एक महिन्याअगोदर गाठी व्यवसायाला सुरुवात करतात. या व्यवसायातून लाखोची उलाढाल होत आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांना एक महिना रोजगार मिळत आहे.
हिंदू संस्कृतीत होळीला पूजेचा विशेष महत्त्व आहे. त्यामुळे होळीला गाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. होळी सणाच्या पर्वावर पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आजही पिढीजात बांधव साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणाऱ्या या गाठीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा उत्सव कित्येकांना महिन्याभराचा हाताला रोजगारसुद्धा देत असतो. या पिढीजात व्यवसायात आंधळगाव येथील ठाकरे व बडवाईक कुटुंब गाठी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गाठ्यांच्या विक्रीतून दरवर्षी लाखोंची उलाढाल करतात. मधुमेह रोगाच्या वाढत्या प्रभावाने शहरासह ग्रामीण भागातील जनतेने साखरेकडे वळण्याचा कल कमी केला आहे. त्यामुळे उत्तरती कळा आलेल्या या व्यवसायाने आता थोडी भरारी घेतली.
अशा होतात गाठ्या तयार
साखरेला वितळवून त्याचा पाक तयार करण्यात येतो. हा गरम पाक दूधमिश्रित लाकडाच्या बनविलेल्या साच्यात हळूवारपणे टाकून त्याला थंड होऊ दिल्यानंतर अशा प्रकारे गाठ्यांच्या माळा अगदी दहा मिनिटांत तयार होतात. त्यामध्ये ५० ग्रॅमपासून एक किलो किलोपर्यंतच्या गाठ्या तयार केल्या जातात.
तसेच दुसऱ्या प्रकारात सुरुवातीला एका कढईला उष्णता देऊन यात गरजेनुसार पाणी आणि साखर टाकली जाते. नंतर यात दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. मग याला चाचणी देऊन या साखरेचे पाणी एका लाकडी साचात दोरे टाकून भरले जाते. काही वेळाने ते थंड झाले की, हे लाकडी साचे वेगळे काढले जातात. मग यातून तयार होतो तो साखरेचा पांढरा शुभ्र हार. रंगीबेरंगी गाठीसाठीही कुलर टाकून आकर्षक गाठी बनविल्या जांतात,
देवकुले परिवाराने जपला गोडवा
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील देवकुले कुटुंबामध्ये या गाठी निर्मितीचा व्यवसाय परंपरागतरीत्या चालत आला आहे. गाठी बनविण्याच्या व्यवसायाला महाशिवरात्रीपासूनच सुरुवात होते आणि साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत या कामाची लगबग सुरू राहते. पांढऱ्या शुभ्र, गुलाबी, पिवळे अशी रंगीबेरंगी गाठी तयार केली जाते. गेल्या चार पिढ्यांचा हा उद्योग त्यांनी आजही तितक्याच समर्थपणे यशस्वी करून दाखविला आहे.
परजिल्ह्यांत गाठ्यांची निर्यात
आंधळगाव येथील पुरुषोत्तम ठाकरे यांना १९९५ पासून गाठीचा व्यवसाय करण्याचे सुचले. आता त्या व्यवसायात त्यांची मुलेसुद्धा त्यांना हातभार लावत संपूर्ण भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील जिल्ह्यात गाठी विक्रीचा व्यवसाय जोमात करीत आहेत. नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, आदी ठिकाणी ट्रकद्वारे गाठी पोहोचविण्याचे काम करतात.