वरुणराजाची हजेरी लागण्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. कुठे गावरान आंबा तर कुठे बाजारातून आंबे आणून लोणचे बनवण्याचं काम सुरू आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील अशा कैऱ्यांपासून लोणचे बनवण्यावर विशेष भर दिला जातो. शेतावर जाणारे मजूर, कामगार, कष्टकरी भाकरी ठेचा सोबतच लोणच्यास विशेष पसंती देतात. असंच गावाकडचं लोणचं कसं बनवलं जातं, हे आपण पाहणार आहोत.
कै-या चांगल्या आवळून येण्यासाठी चार-सहा तास सावलीला पाण्यात ठेवल्या जातात. फोडतांना त्यांचा चेंदामेंदा होत नाही, मग त्या पाण्याने धुवून घेतल्या जातात. त्यानंतर कैऱ्या स्वच्छ फडक्याने पुसून फोडल्या जातात. फोडून झालेलं लोणच्याच्या फोडी काही वेळ हवेत पसरवून ठेवल्या जातात. त्यातल्या कोयाचे (म्हणजे बी) तुकडे वैगरे वेगळे केले जातात..
लोणचं तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ
हळद मिठ, लसून, मोहरी, मेथी, का-हाळं, हिंग, तेल, चवीपुरत तिखट, कै-या. (कै-या आंबट असतील तर त्याचं लोणचं चविष्ट लागतं.)
कृती : आंब्याच्या कै-याच्या फोडलेल्या फोडी एका परातीत, पातेल्यात किंवा घमेल्यात घेऊन त्यात हळद, मीठ, सोललेला लसूण, हिंग, का-ह्याळं, रगडून घेतलेली मेंथी, भाजून घेतलेली मोहरी आणि गरम करून टाकलेलं तेल, या सगळ्यांचं एकत्र मिश्रण करून घेतले जाते. जेणेकरून मीठ, हळद आणि इतर सर्व पदार्थ लोणच्याच्या प्रत्येक फोडीला लागेलं. अशा पद्धतीने सगळं एकत्र मिश्रण करून झालं की मातीच्या घागरीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवतात. घागरीचे किंवा बरणीचे तोंड बंद केले जाते. लोणचं भरून ठेवलेली घागर किंवा बरणी काही दिवस सकाळ-संध्याकाळ हलवत राहतात. काही दिवसाने लोणचं मुरायला सुरू होत. लोणचं जसं मुरत जात तसं ते अधिक चविष्ट आणि रुचकर होत जातं. अशा पद्धतीने तयार केलेले लोणचे दोन दोन तीन तीन वर्षे टिकते. लोणच्याची घागर किंवा बरणी नेहमीच हवाबंद ठेवली जाते. लोणचं लवकर खराब होऊन नये म्हणून पूर्वी ज्या घागरीत लोणचं भरायचे आहे, त्या घागरीला आतून लसूण किंवा लिंबाची पान जाळून ऊब दिली जायची. तसेच फार तापमान असतांना लोणचं घातले जात नाही, म्हणजे तयार केले जात नाही. उष्ण वातावरणात घातलेलं लोणचं लवकर खराब होत असं म्हणतात.. साभार : लक्ष्मण खेडकर गुरुजी, अहमदनगर