Join us

Vasant Sugar Factory : वसंत सहकारी साखर कारखाना बंदच्या अफवा, विजयादशमीपासून गाळप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 2:43 PM

Agriculture News : भाडेकरारनामा रद्द करण्याबाबत बँकेला दिलेले पत्र हे नजरचुकीने पाठविण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले.

यवतमाळ : भैरवनाथ शुगर वर्क्स यांनी भाडेकरारनामा रद्द करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेला District Bank) दिलेले पत्र हे नजरचुकीने पाठविण्यात आले. त्यात कुठलीही सत्यता नाही. सद्यस्थितीत वॉयलरच्या टेक्निकल टीमचे व इतर अंतर्गत कामे ही वेगाने सुरू आहेत. रोलर रिसेलिंगकरिता पाठविण्यात आले आहेत. माजी खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात विजयादशमीच्या (Vijayadashami) मुहूर्तावर वसंत सहकारी कारखान्याचे गाळप सुरू करण्यात येईल. हा कारखाना सुरूच राहणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी दिली.

स्थानिक शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा यवतमाळ-पुसदचे समन्वयक नितीन भुतडा, किसनराव वानखेडे उपस्थित होते. नजरचुकीने भैरवनाथ शुगर वर्क्सकडून बँकेला गेलेले पत्र काही असंतुष्ट मंडळी समाज माध्यमावर व्हायरल करून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सरपणे करत आहेत. ऊस उत्पादकांत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कर्मभूमीत त्यांच्या नावे असलेला वसंत साखर कारखाना कदापीही बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. उमरखेड, पुसद, महागाव, हदगाव, हिमायतनगर या पाचही तालुक्यांतील ऊस उत्पादकांना घाबरण्याचे काही कारण नाही. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरलेल्या उसाला रस्त्यावर पडू देणार नाही. बंद अवस्थेत असलेला वसंत साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करून शेतकऱ्यांना संजीवनी प्रदान करण्यासाठी हाती घेतलेला शेतकरी सेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवू, असे देशमुख यांनी सांगितले. 

अफवांवर विश्वास ठेवू नये

'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर मागील वर्षीपासून वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यात येत आहे. शेकडो ऊस उत्पादक शेतकरी आमच्या कार्यप्रणालीवर संतुष्ट आहेत. यापुढेही वसंत सुरू राहावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देशमुख यांनी केले.

टॅग्स :साखर कारखानेऊसयवतमाळशेती क्षेत्र