Join us

साखर कारखान्यांचा इथेनॉल निर्मितीवर भर, साखर उद्योगाची स्थेर्याकडे वाटचाल? पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 8:17 PM

सरकारने दीर्घकालीन योजना आखत इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटवावे साखरचे किमान विक्री दर वाढवावे अशी मागणी साखर उद्योग क्षेत्रातून होत आहे.

भगवान गायकवाड

देशभरात गेल्या काही वर्षात साखरेचे उत्पादन वाढण्याने साखरेला अपेक्षित भाव मिळत नसल्याने साखर उद्योग अडचणीत येत असताना त्यावर इथेनॉल निर्मिती च्या तोडग्याने साखर उद्योग स्थैर्याकडे वाटचाल सुरू झाली होती. मात्र गेल्या वर्षी व यंदा दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटत साखर निर्मिती कमी होवून जगात साखरेचे भाव वधारण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने साखरेची देशांतर्गत टंचाई होवून संभाव्य भाववाढ रोखण्यासाठी अगोदरच साखर निर्यात बंदी केली. आता इथेनॉल निर्मिती वरील बंधनाने साखर निर्मितीत घट होवून साखरेचे भाव स्थिर होण्याची चिन्ह असून साखर उद्योग मात्र पुन्हा अस्थिरतेच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. 

राज्यात साखर उद्योगावर अनेक घटक अवलंबून असून त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे ऊस हे एकमेव पीक आहे. गेल्या काही वर्षात जगासोबतच भारतातही साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने साखरेचे भाव कमी होत साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले. अनेक कारखान्यांना वेळेत ऊसदर एफ आरपी देता आली नाही. केंद्राने त्यासाठी कारखान्यांना कर्ज ही दिले, मात्र केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे अशक्य असल्याने उप पदार्थही निर्मिती प्रकल्प हाती घेण्यात आले. साखर निर्मिती करून ती विकण्यासाठी केंद्र सरकार वर्षात किती साखर लागेल, याचा विचार करत महिन्याला ठराविक साखर विक्री करण्याचे उद्दिष्ट देते. त्यामुळे साखर गोदामात राहून त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याजाचा बोजा सहन करावा लागतो. या उलट इथेनॉल निर्मिती नंतर अवघ्या पंधरा वीस दिवसांत त्याची विक्री होत व्याजाचा भुर्दंड वाचत असून इथेनॉलला दरही चांगले असल्याने साखर कारखाने इथेनॉल निर्मितीवर भर देताना दिसत होते.

साखर उद्योगाची स्थेर्याकडे वाटचाल?

त्यात इथेनॉल निर्मितीने पेट्रोलची आयात कमी होत देशाचा मोठा फायदा या व्यवसायातून दिसत असल्याने केंद्राने या प्रकल्पांना विविध सवलती देत प्रोत्साहन दिले. त्यामुळे जवळपास सर्व कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प सुरू केले, सुरवातीला फक्त सी हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल निर्मिती होत पुढे थेट उसाचा रस व सिरप पासून करण्याची परवानगी देत त्या इथेनॉलला जादा भाव देण्याचे ही जाहीर केले. सर्व कारखान्यांनी मोठी गुंतवणूक करत सदर प्रकल्प सुरू केले. परिणामी गेल्या तीन वर्षात साखरेचे उत्पादन घटले, अनेक कारखाने साखर निर्मितीत तोट्यात गेले, मात्र इथेनॉल व अन्य उपपदार्थ निर्मितीत नफ्यात आले, त्यामुळे साखर उद्योगाची स्थेर्याकडे वाटचाल सुरू झाली.

साखर उत्पादन वाढणार पण.... 

गेल्या वर्षापासून दुष्काळामुळे ऊस लागवड कमी होत उस टंचाई निर्माण झाली. त्यामुळे साखरेचे निश्चित भाव वाढणार, या भरवश्यावर ऊस पळवापळवीसाठी अनेक कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा भावाच्या घोषणा हंगाम सुरू होताच केल्या, मात्र अचानक केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील बंधन घातल्याने साखर उद्योगात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सुरवातीला रस व सिरप पासून इथेनॉल बंदीची घोषणा सरकारने मागे घेतली असली तरी किती उत्पादन घ्यायचे हा कोटा ठरवून दिला आहे. बी हेव्हीपासून इथेनॉल निर्मिती कोट्याला ही कात्री लावत कमी उत्पादन घेण्याचे आदेश दिले आहे. परिणामी साखर उत्पादन वाढणार असून कारखान्यांनी साखर भाव वाढीच्या भरवशावर उसाच्या भावाच्या दिलेले आश्वासन जर साखरेचे भाव नाही वाढले तर कशा पूर्ण करायचे हा प्रश्न सतावत आहे. यंदा उसाला जादा भाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा ही फोल ठरण्याची चिन्ह आहे.

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटवावे

तसेच सदर प्रकल्पांसाठी केलेली भांडवली गुंतवणूक कर्जफेड कशी करायची, याचीही विवंचना साखर कारखान्यांना आहे. इथेनॉल सोबतच सीएनजी हायड्रोजन आदी प्रकल्पांना चालना दिल्याचे जाहीर केल्याने अनेकांनी इथेनॉल प्रकल्प क्षमता वाढविण्यासोबतच इतर प्रकल्प हाती ही घेतले, मात्र अचानक इथेनॉल प्रकल्पावरील बंधनाच्या निर्णयाने नव्या प्रकल्पांना खीळ बसणार आहे. देशातील अतिरिक्त साखर निर्मिती रोखण्यासाठी इथेनॉल प्रकल्पांना दिलेल्या चालनेची मात्र आता साखर निर्मिती कमी करण्यासाठी कमी करण्यात आली आहे. सरकारने दीर्घकालीन योजना आखत इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटवावे साखरचे किमान विक्री दर वाढवावे अशी मागणी साखर उद्योग क्षेत्रातून होत आहे.

उसाचे एफआरपीच्या तुलनेत साखरेचे किमान दर वाढवावे... 

केंद्र सरकारने उसाचे उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर एफआरपी निश्चित केली असून त्यात दरवर्षी वाढ होत आहे. मात्र साखरेचे किमान विक्री दर हे गेल्या पाच वर्षापासून वाढलेले नाही. त्यामुळे जवळपास सर्व कारखाने साखर उत्पादनात तोट्यात जात असताना इथेनॉल व अन्य उपपदार्थ निर्मितीत फायद्यात असल्याने साखर उद्योगास इथेनॉल प्रकल्पाचा मोठा फायदा होत कुठे तरी साखर उद्योगास आर्थिक स्थैर्य मिळताना दिसत होते. दुष्काळामुळे ऊस उत्पादनात घट होत यंदा साखर उत्पादन कमी होत जादा भाव मिळण्याची अपेक्षा होती. परंतु इथेनॉल निर्मिती बंदच्या निर्णयाने साखर उद्योगाला मोठा धक्का बसला होता. परंतु बंदी मागे घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी इथेनॉल निर्मितीवरील बंधनामुळे साखर निर्मिती वाढून साखरेच्या भावावर त्याचा परिणाम होत साखर उद्योग अडचणीत येण्याची चिन्हं आहे. साखर उद्योग अडचणीत येवू नये, यासाठी सरकारने उपाययोजना करत उसाचे एफआरपीच्या तुलनेत साखरेचे किमान दर वाढवावे इथेनॉल निर्मितीस पूर्वीप्रमाणे चालना देणे अत्यावश्यक असल्याचे मत कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी व्यक्त केले आहे.  

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकसाखर कारखानेऊस