महाराष्ट्रातील प्रमुख फळभाज्यांमध्ये टोमॅटोचा समावेश होतो, भाजीपाल्यामध्ये बटाटा हा सर्वश्रेष्ठ समजला जातो आणि त्यानंतर टोमॅटोचा क्रमांक लागतो. टोमॅटो हे मुळ पेरू देशांतील अमेरिका खंडातील आहे आणि त्याचा तेथूनच सगळीकडे प्रसार होऊ लागला आहे. टोमॅटोचा प्रसार दुसऱ्या महायुध्दानंतर फार मोठ्या प्रमाणावर झाला. टोमॅटोचा प्रसार सबंध जगभर असून अमेरिका, युरोप, ऑस्टेलिया, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये त्याची कार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भारतात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये होते. महाराष्ट्रात टोमॅटो पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र साधारणपणे ५,६०० हेक्टरच्या जवळपास आहे.
औषधी गुणधर्म
टोमॅटोचे आहारातील महत्व अनन्यसाधारण आहे. शरीर स्वास्थ्यासाठी लागणारी अ, ब आणि क ही जीवनसत्वे तसेच खनिजे, चुना, लोह, सल्फर, कॅल्शियम इ. पोषक अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात आढळतात. मधुमेह, खरुज या रोगांसाठी टोमॅटो गुणकारी आहे.
टोमॅटो फळांची काढणी व साठवणूक
टोमॅटो फळे परिपक्क झाल्याची सर्वात पहिली आणि महत्वाची खूण म्हणजे फळांचा हिरवा रंग नाहीसा होऊन फळे पिवळसर गुलाबी, लाल आणि गडद लाल अशी दिसायला लागतात, लांबच्या बाजारपेठेसाठी पाठविण्याकरीता काहीशी हिरवट अशी टोमॅटो फळांची काढणी करावी. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी टोमॅटो फळे ही पूर्ण पिकलेली, लालसर रंगाची असतांनाच तोडावीत म्हणजे तयार झालेल्या प्रक्रियायुक्त पदार्थाना आकर्षक असा लाल रंग येऊन स्थांना बाजारभाव जास्त मिळतो. फळांची काढणी नेहमी सकाळीच करावी कारण अशी फळे साठवणुकीत चांगल्या प्रकारे टिकतात. फळांची काढणी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले साधन आणि बाजारपेठेचे अंतर यांचा विचार करून करावी.
किडलेली. नासलेली, फुटलेली आणि तडा गेलेली फळे बाजूला करून फक्त निरोगी, आकर्षक, स्वच्छ व टवटवीत फळांची त्यांच्या आकारमानानुसार प्रतवारी करावी की जेणेकरून फळे एकसारखी दिसतील, बाजारपेठेतील टोमॅटोची हाताळणी कशी करावी हे आकृती क्र. १ मध्ये दाखविले आहे.
टोमॅटो हे फारच नाशवंत फळ असून ते दीर्घकाळ साठवून जतन करण्याची सोय नसल्यामुळे ती लवकर खराब होतात टोमॅटो फळे गर्द हिरव्या अवस्थेत साठवणुकीत चांगल्या प्रकारे राहू शकतात साठवणुकीतील तापमानाचा फळाच्या टणकपणावर विपरीत परिणाम होतो. प्रयोगाअंती असे आढळून आले आहे की, जर टोमॅटो फळे २० अंश से. तापमानाला ठेवली तर ती फळे २१ दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात. परंतु साठवणूकीतील तापमान ७.२ ते ८ अंश से. च्या खाली गेले तर फळांना काळसर डाग पडतात.
गर्द हिरव्या रंगाचे टोमॅटो जर १३ अंश से. तापमानाला दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवले तर ते कुजण्याची व पिकल्यानंतर लाल रंग न येण्याची शक्यता जास्त असते. गर्द हिरव्या रंगाची टोमॅटो फळे पिकण्यासाठी सर्वसाधारण १८ ते २१ अंश से. तापमानाची आवश्यकता असते.
लालसर टोमॅटो साठवणुकीत १० अंश से. तापमानाला एक आठवड्यापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात.परंतु ह्या तापमानाला जास्त कालावधीसाठी फळे ठेवली तर ती खराब होण्याची राज्यता असते. पूर्ण पिकलेली फळे ७ ते१० अंश से. तापमानाला काही दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात. परंतु पूर्ण पिकलेले टोमॅटो जर ५ अंश से.किंवा त्यापेक्षा कमी तापमानाला साठवणुकीत ठेवले तर त्यांचा आकर्षक रंग व आयुष्यमान कमी होण्याची शक्यता असते.
अ) शीतगृहात साठवणूक:
टोमॅटो फळाकरीता साठवणुकीतील तापमान फळाच्या पक्तेनुसार बदलत असते. जर पिकण्याची क्रिया लांबवावयाची असेल तर वाहतुकीतील तापमान १० ते १२.८ अंश से. असले तरी ते फळांना हानीकारक नसते. परंतु ही परिस्थिती जर जास्त काळ राहिली तर साठवणुकीतील तापमानाचा फळांच्या पिकल्यानंतर रंगावर व वासावर विपरीत परिणाम होतो. टोमॅटो फळे जर साठवणुकीत १० अंश से. तापमानाच्या खाली २४ तासापेक्षा जास्त वेळ ठेवली तर फळांना काळसर डाग पडतात. पिवळसर टोमॅटो फळे साठवणुकीत ४.४ अंश से. तापमानाला चार दिवस जरी ठेवली तरी ती फळे काळसर पडत नाहीत.प्रयोगाने असे सिध्द झाले आहे की, टोमॅटो फळे ८५ ते ९० टक्के आर्द्रतेला पिकवावीत या साठवावीत. कारण साठवणुकीतील आर्द्रता जर कमी असेल तर बाष्पीभवनाद्वारे फळातील पाण्याचे प्रमाण फारच कमी होते आणि जर आर्द्रता जास्त असेल तर सूक्ष्मजंतूमूळे फळांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, म्हणून टोमॅटोच्या बऱ्याचशा जाती साठवणुकीत १२ अंश से. तापमानाला चांगल्या स्थितीत राहू शकतात.
ब) रसायनांचा वापर करून साठवणूक:
प्रयोगाने असे निदर्शनास आले आहे की, काढणीनंतर जर टोमॅटो फळांना जिब्रेलिक अॅसिड या संप्रेरकाचे संस्करण केले तर फळ पिकण्याची क्रिया काही काळापुरती लांबविता येते. त्याचप्रमाणे २. ४. ५-टी, कायनेटिन, २ ४-डी या संप्रेरकाचे काढणीनंतर संस्करण केल्यास टोमॅटो फळ आपणांस पाहिजे असल्यास लवकर पिकविता येतात. कॅप्टन, डायथेन आणि थायरम ही बुरशीनाशक औषधे जर वेक्सच्या द्रावणात मिसळून टोमॅटो फळांवर लावली तर साठवणुकीत फळाचा रोगापासून बचाव करता येतो तसेच काढणीनंतर टोमेटो फळांना जर रोहरौल या बुरशीनाशकाचे संस्करण केले तर साठवणुकीत फळे लवकर पिकतात.संशोधनाद्वारे असे निदर्शनास आले आहे की, कॅल्शियमच्या वापराने टोमॅटो फळांची पिकण्याची क्रिया लांबविता येते, जर फळातील कॅल्शियमचे प्रमाण ४० मि. ग्रॅ./१०० ग्रॅम वजनाच्या पुढे असेल तर फळे साठवणुकीत २० अंश से. तापमानाला ६ आठवड्यापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात. तसेच टोमॅटो साठवणुकीच्या वेळेस त्यांच्या पॅकिंगमध्ये प्युराफिल या रसायनाचा वापर केल्यास टोमॅटो पिकण्याची क्रिया साधारणत: एक आठवड्यापर्यंत लांबविता येते. संप्रेरकामुळे पिकांवरील कीड आणि रोगांचे बन्याच अंशी नियंत्रण करता येते आणि त्यांचे अवर्षणापासून संरक्षण करता येते उदा फास्फोन एस डॅमिनोझाईड आणि सायकोसिलचा संस्कार करून टोमॅटो पिकांची अवर्षण प्रतिकारक्षमता वाढवता येते. महाराष्ट्रासारख्या अवर्षणग्रस्त कोरडवाहू शेतीमध्ये हे एक वरदानच ठरेल.
डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके आणि डॉ. बाबासाहेब भिटे
कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग,डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मफुकृवि, राहुरी