कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकाऊ पदार्थ बनविण्याच्या पद्धती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केल्या आहेत.
या पध्दतीचा अवलंब केल्यास टिकाऊ पदार्थ तयार करून व्यवसायाची संधी आहे. घरगुती व्यवसायातून महिलांनासुध्दा अर्थार्जनही करता येते. आपण आंब्याचे पन्हे व आंबा पोळी कसे बनवायची ते सविस्तर पाहूया.
कच्च्या आंब्याचे पन्हे
◼️ पूर्ण वाढ झालेली परंतु कच्ची फळे चांगली शिजवावीत.
◼️ शिजलेली फळे थंड झाल्यावर त्यांचा गर काढावा.
◼️ एक किलो आंबा पन्हे तयार करण्यासाठी २०० ग्रॅम कच्च्या आंब्याचा गर, १५० ते १७५ ग्रॅम साखर व ६२५ ते ६५० मि.ली पाणी मिसळावे.
◼️ हे मिश्रण १ मि.मी च्या चाळणीतून गाळून घ्यावे.
◼️ पन्हे जास्त काळ टिकावे म्हणून प्रती किलो पन्ह्यात १४० मिलीग्रॅम पोटॅशिअयम मेटाबाय सल्फाईट हे परिरक्षक मिसळावे.
◼️ नंतर हे पन्हे गरम असताना निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावे आणि बाटल्या क्राऊन काॅर्क मशीनने झाकण लावून बंद कराव्यात.
◼️ त्यानंतर पन्हे भरून बंद केलेल्या बाटल्यांचे उकळत्या पाण्यात (८५ ते १०० अंश सेल्सियस तापमान) पाश्चरीकरण करावे.
◼️ बाटल्या थंड झाल्यावर त्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
आंबा पोळी
◼️ प्रथम चांगल्या पिकलेल्या फळांपासून रस काढून एक मिली मीटरच्या चाळणीतून गाळून घ्यावा.
◼️ तो चांगला शिजवून त्यात ०.१ टक्के पोटॅशिअम मेटाबाय सल्फाईट (१ किलो रसासाठी १ ग्रॅम) व ३० टक्के साखर मिसळावी.
◼️ त्यानंतर स्टीलच्या ताटाच्या आतल्या बाजूस तूप लावून त्यावर आमरसाचा पातळ थर द्यावा.
◼️ हा रस सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रामध्ये (५५ ते ६० अंश सेल्सियस तापमान) वाळवावा.
◼️ एक थर वाळल्यानंतर त्यावर पुन्हा पातळ थर द्यावा व वाळवावा. ही कृती जाडपोळीसाठी करावी.
अधिक वाचा: नारळापासून विविध पदार्थ बनविण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलंय हे नवीन यंत्र; वाचा सविस्तर