पुणे : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला अनेकदा दर मिळत नसल्यामुळे मातीमोल दरात शेतमाल विकावा लागतो. कधीकधी कांदा, टोमॅटो, फुले, दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्याचं आपण पाहिलं असेल. मालाला दर मिळत नाही आणि प्रक्रिया करून विक्री करावी तर प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे भांडवल नसते. या सगळ्या परिस्थितीवर मात करत मराठवाड्यातील एक तरूण शेतकरी स्वत:च्या शेतात पिकवलेल्या हळदीची विक्री छत्रपती संभाजीनगर, पुणे शहरांत करत आहे. बाजारदरात होणाऱ्या चढउतारावर त्याने उपाय शोधून काढला असून यामुळे या तरूणाला दुप्पट फायदा होत आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर येथील आनंद काळबांडे असं या तरूण शेतकऱ्याचं नाव असून तो स्वत:च्या २ एकर शेतामध्ये दरवर्षी हळदीचे पीक घेतो. त्याच्या हळदीला बाजार समितीत किंवा व्यापाऱ्यांकडे सर्वसाधारण दर मिळतो. या दरातून चांगले अर्थार्जन होत नव्हते त्यामुळे त्याने हळद तयार करून थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याने दुचाकीला दोन चाकी गाडा बांधला आणि त्यामध्ये एक गिरणी ठेवून ग्राहकांसमोर हळकुंडापासून हळद तयार करून विक्री करण्यास सुरूवात केली.
परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात विक्रीआनंदने सुरूवातील परभणी शहरामध्ये हळदीची विक्री करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर येथे हळदीची विक्री करण्यासाठी आला. छत्रपती संभाजीनगर येथे विक्री केल्यानंतर तो आता पुण्यात विक्री करत असून व्यापाऱ्यांना विक्री केलेल्या हळदीतून जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा दुप्पट पैसे आनंद थेट विक्रीतून कमावतो.
प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठी संधी
शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे अनेकदा शेतकरी माल फेकून देतात. पण अशा प्रकारे कमी खर्चामध्ये शेतमालावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना विक्री केली तर शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येऊ शकतो. काही प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी जास्त खर्च लागतो पण सोयाबीनपासून तेल काढणे, उसापासून गूळ बनवणे, दुधापासून खवा, पनीर किंवा इतर पदार्थ बनवणे अशा उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी कमी खर्च लागतो त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन जास्ती जास्त नफा कमावला पाहिजे.
सध्या बाजारात भेसळयुक्त माल विक्री केला जातो म्हणून ग्राहकांना नैसर्गिक आणि चांगल्या पद्धतीची हळद खायला मिळावी असं मला वाटलं आणि मी हा व्यवसाय सुरू केला. माझ्या शेतात लागवड केलेल्या २ एकरमधून तब्बल ४० क्विंटल उत्पादन होतं. व्यापाऱ्याला माल विकला असता तर मला एकरी २ लाख रूपये मिळाले असते. पण मी थेट हळद तयार करून विक्री करत असल्यामुळे ४ ते ५ लाख रूपये उत्पादन मिळते.- आनंद काळबांडे (हळद विक्रेता)मो. नं. - 84594 95808