आंब्याबरोबरच काजू उत्पादनातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र, काजू बोंडावर प्रक्रिया करणारे प्रक्रिया उद्योग अजूनही न आल्याने ही बोंडे वाया जातात. या वाया जाणाऱ्या बोंडांपासून देवरुखातील निखिल कोळवणकर यांनी सरबत बनविले आहे. हे सरबत ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
काजू बोंड सुवासिक, रसाळ व पातळ सालीचे असते. आरोग्याच्या दृष्टीने ते खाण्यास उत्तम असते. काजू बोंडामध्ये संत्र्यापेक्षा ६ पट जास्त व्हिटॅमीन सी असते. प्रोटीन्स, मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम असते. त्यामुळे काजू बोंडापासून बनवलेले सरबत अत्यंत गुणकारी व आरोग्यदायी मानले जाते. काजू बोंड किडनी विकारावर अत्यंत गुणकारी मानले जाते.
निखिल कोळवणकर हे क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी शासनाचे फळप्रक्रिया प्रशिक्षणही घेतले आहे. निखिल कोळवणकर यांना क्रांती व्यापारी संघटनेचे सचिव अण्णा बेर्डे यांनी काजूची बोंडे आणून दिली. त्यावेळी त्यांना त्यापासून पेय बनवण्याची कल्पना सुचली. त्यांनी बोंडाचा रस, मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, सोडा टाकून पेय तयार केले. ते अनेकांच्या पसंतीस उतरले आहे.
हा प्रयोग आणखी यशस्वी झाल्यास असंख्य तरुणांना त्यातून स्वयंरोजगार उभा करणे शक्य होणार आहे. लाखो टन बोंडे वाया जात असल्याने त्यावर प्रक्रिया झाल्यास तो कोकणातील मोठा उद्योग ठरू शकेल. बोंडाचा रस आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने त्यापासून तयार झालेल्या सरबताला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकेल, अशी आशा आहे. त्यासाठी मोठ्या स्तरावर प्रयत्नांची गरज आहे.
• लाखो टन बोंडे दरवर्षी हातात मातीमोल.• केवळ काजू बियांचाच होतो वापर.• हजारो तरुणांना यातून रोजगार उभा करणे शक्य.
काजूच्या बोंडांपासून बनविलेल्या पेयाची स्टॉलच्या माध्यमातून विक्री केल्यास बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यास हातभार लागेल. हे पेय तयार करण्यासाठीचा खर्च अतिशय कमी आहे. त्यामुळे या पेयाच्या विक्रीतून चांगला फायदा होऊ शकतो. - निखिल कोळवणकर
अधिक वाचा: कोकणी मेव्यावरील प्रक्रिया उद्योग अधिकच्या उत्पन्नाची हमी