हळद काढणीनंतर शिजविण्यासाठी सावलीत अथवा पाल्याखाली साठवण करावी व ४ ते ५ दिवसांमध्येच हळदीवर शिजविण्याची प्रक्रिया करावी. हळकुंडांचा आकार एकसारखा नसतो, जाडी कमी-अधिक असते. त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ लागतो, तर बारीक हळकुंडांना कमी वेळ लागतो. म्हणून हळद शिजविण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करून घ्यावी.
हळद का शिजवावी?
• हळद शिजविल्यामुळे बुरशी व इतर जिवाणू यांचा नाश होऊन हळकुंड रोगमुक्त राहते.
• हळकुंडांवरील धागे व इतर दुर्गंधी येणारे घटक निघून जातात.
• हळदीतील शर्करा राखून ठेवली जाते.
• हळद शिजविल्यामुळे वाळण्याची प्रक्रिया लवकर होते.
हळद काहिलीत शिजवण्याची पध्दत
काहिलीत हळद शिजविणे ही एक पारंपरिक पद्धत असून, या पद्धतीचे तोटे खालीलप्रमाणे आहेत.
• इंधन व वेळ जास्त लागतो.
• तळातील हळद जास्त शिजते, मध्यभागातील हळद योग्य शिजते, तर शेंड्यावरची हळद कमी शिजते.
• शेणमातीचा वापर केल्यामुळे हळदीचा अन्नासाठी वापर करण्यास मर्यादा येतात.
• काहिलीतून हळद काढण्यास वेळ लागतो. परिणामी मजुरांच्या खर्चात वाढ होते.
• हळदीचा दर्जा खालावतो, कुरकुमीनचे प्रमाण कमी होते.
अधिक वाचा: कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी शास्त्रीय पद्धतीने हळद काढणी कशी करावी?
वाफेच्या साहाय्याने संयंत्राने हळद शिजविणे
वाफेच्या साहाय्याने संयंत्राने हळद शिजविण्यासाठी मशिन वापरले जाते. यास बॉयलर असेदेखील संबोधतात. वाफेच्या साहाय्याने संयंत्राने हळद शिजविणे ही एक सुधारित पद्धत असून, या पद्धतीचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
• ड्रममधील संपूर्ण हळद योग्यरीत्या शिजते.
• हळदीचा दर्जा योग्य राखला जातो, कुरकुमीनचे प्रमाण हळदीत आहे तसे साठविले जाते.
• एका बॅचमध्ये २०० किलो कंद आणि दररोज ८ तासांत ४० क्विंटल हळद कंद उकळता येतात.
• हळद कंदाची २०० किलोची एक बेंच उकळण्यासाठी सुमारे २५ ते ३० किलो सरपणाची गरज आहे.
• केवळ तीनच माणसे एका दिवसात ४० क्चिंटल हळद कंद शिजवू शकतात.
• कुशल मजुरांची आवश्यकता नसते, घरातील लोक हे काम करू शकतात. परिणामी मजुरांच्या खर्चात बचत होते.
• शेतकऱ्यांच्या गरजेनुसार या संयंत्राचे आकारमान वाढविता अथवा कमी करता येते.
• केवळ वाफेवर उकळल्यामुळे कंद कमी प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि लवकर वाळतात. पारंपरिक पद्धतीत कंद वाळण्यासाठी २० दिवस लागतात; परंतु या सुधारित पद्धतीत कंद वाळण्यासाठी एक आठवडा पुरेसा होतो.
डॉ. पी.जी.पाटील
कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी