कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकावू पदार्थ बनविण्याच्या पध्दती विद्यापिठाने प्रमाणित केल्या आहेत. या पध्दतीचा अवलंब करून उद्योगाला गती मिळत आहे.
त्यासाठी शासकीय अनुदान लाभत असून अनेक बागायतदारांनी जोड व्यवसाय म्हणून प्रक्रिया व्यवसाय सुरू केला आहे.
काजू बोंडापासून सिरप
काजू बी काढून घेतली की बोंड टाकून दिले जाते. मात्र या बोंडाच्या रसापासून स्वादिष्ट पेय तयार करता येते.
- ५०० ग्रॅम काजूच्या रसामध्ये एक किलो साखर व १५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे.
- मिश्रण ढवळून एकजीव झाल्यानंतर त्यात ६१० मिलीग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट हे परिरक्षक प्रति किलो सिरप या प्रमाणात मिसळावे.
- (स्क्वेंशमध्ये किंवा सिरपमध्ये परिरक्षक मिसळण्यापूर्वी ते थोड्याशा स्क्वॅश किंवा सिरपमध्ये चांगले विरघळावे व नंतर ते मुख्य पेयात मिसळावे मिसळवावे)
- सिरप मलमलच्या कपड्यातून गाळून घेऊन काचेच्या बाटलीत अथवा फूड ग्रेड प्लॅस्टीक कॅनमध्ये भरून साठवावे आणि थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावे.
कच्चे आंब्याचे पन्हे
- पूर्ण वाढ झालेली परंतु कच्ची फळे चांगली शिजवावीत.
- शिजवलेली फळे थंड झाल्यावर त्यांचा गर काढावा.
- एक किलो आंबा पन्हे तयार करण्यासाठी २०० ग्रॅम कच्च्या आंब्याचा गर, १५० ते १७५ ग्रॅम साखर, ६२५ ते ६५० मिली पाणी मिसळावे.
- हे मिश्रण एक मि.मी च्या चाळणीतून गाळून घ्यावे.
- पन्हे जास्त दिवस टिकावे म्हणून प्रति किलो पन्ह्यात १४० मिलीग्रॅम पोटॅशिअम मेटाबाय सल्फाईट हे परीरक्षक मिसळावे.
- हे पन्हे गरम असताना निर्जंतूक केलेल्या बाटलीत भरावे.
आंबा पोळी
- पिकलेल्या प्रथम चांगल्या आंब्यापासून रस काढून १ मि.मी च्या चाळणीतून गाळून घ्यावा.
- तो चांगला शिजवून त्यात ०.१ टक्के पोटॅशिअयम मेटाबाय सल्फाईट व ३० टक्के साखर मिसळावी.
- त्यानंतर स्टीलच्या ताटाच्या आतल्या बाजूस तूप/तेल लावून त्यावर आमरसाचा पातळ थर द्यावा.
- रस सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रामध्ये वाळवावा.
- एक थर वाळल्यानंतर त्यावर पुन्हा पातळ थर द्यावा व वाळवावा.
- ही कृती आंबा पोळीची जाडी ०.६ ते १.२५ सेंटीमीटीर होईपर्यंत करावी.
- पोळी प्लॅस्टिक पिशवीत हवाबंद करून ठेवावी.
करवंदाचे सिरप
- पिकलेल्या करवंदापासून सिरप तयार करण्यासाठी सर्वप्रथम पूर्ण पिकलेली ताजी, रसरशीत करवंदे निवडून व पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत.
- नंतर करवंदे न शिजवता चाळणीवर घालून त्यापासून रस काढावा.
- एक किलो रसामध्ये २ किलो साखर टाकून एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६८.५ टक्के करावे.
- त्याचप्रमाणे सायट्रिक आम्ल टाकून सिरपची आम्लता १.५ टक्के ठेवावी.
- निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्यात सिरप भरून बाटल्या कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.