शेती सोबत जोड उद्योग म्हणून सीताफळावर प्रक्रिया केली जाते. सीताफळाचे मूल्यवर्धन केल्यामुळे जास्त किंमत मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी होऊ शकेल. अशा जोड उद्योगामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळवून शेतकरी फक्त शेतकरी न राहता उद्योजक होऊ शकतो.
१०० ग्रॅम सीताफळात अंदाजे ९४ किलो कॅलरीज असतात. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोह हे खनिज घटक असतात. जे हाडांचे आरोग्य आणि रक्त निर्मितीसाठी उपयुक्त असतात.
प्रस्तावित युनिट क्षेत्रफळ
सीताफळ पल्प तयार करण्यासाठी सुयोग्य पायाभूत सुविधा, आवश्यक यंत्रसामग्री आणि साधनसामग्रीची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. २०० चौरस फूट क्षेत्रामध्ये ही युनिट उभारण्यासाठी खालील घटक आवश्यक आहेत.
पायाभूत सुविधा आणि युटिलिटीज
■ स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण सुविधा
युनिटमध्ये स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी नियमित निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वच्छतेची साधने असावी.
■ पाण्याचा पुरवठा
प्रक्रिया करण्यासाठी तसेच यंत्रसामग्रीची स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा आवश्यक आहे.
■ विद्युत पुरवठा
प्रक्रिया यंत्रसामग्री चालवण्यासाठी सतत विद्युत पुरवठा आवश्यक आहे. तसेच गर गाळणे, पॅकिंग आणि थंड साठवणीसाठी फ्रिजर किंवा डीप फ्रीजरसाठी विजेची गरज आहे.
प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री
■ पल्प एक्सट्रॅक्शन मशीन
सीताफळाचा गर काढण्यासाठी एक्सट्रॅक्शन मशीन आवश्यक आहे. हे मशीन गर काढणे आणि बिया वेगळ्या करण्यास मदत करते.
■ गाळणी (सिव्ह)
पल्प गाळण्यासाठी आणि त्यातील बारीक अशुद्धी काढण्यासाठी गाळणी लागते.
■ निर्जंतुकीकरण यंत्र
काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरते.
■ फ्रिज किंवा डीप फ्रीजर
तयार पल्प ताजे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रिज किंवा डीप फ्रीजर आवश्यक आहे.
प्रक्रियासाठी आवश्यक भांडी आणि साधनसामग्री
■ स्टेनलेस स्टीलचे कंटेनर
फळे, पल्प आणि तयार पल्प साठवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे कंटेनर लागतात. जे अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
■ काटे, स्पॅचुला आणि चमचे
फळांचे साल काढण्यासाठी, गर गोळा करण्यासाठी आणि मिश्रण हलवण्यासाठी हे साधन आवश्यक आहेत.
■ काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्या
पल्प पॅक करण्यासाठी निर्जंतुक केलेल्या बाटल्यांचा वापर केला जातो. पॅकिंगसाठी सीलिंग कॅप्ससह असाव्या.
स्टोरेज आणि पॅकिंग
■ साठवणीची जागा
तयार पल्प आणि कच्च्या फळांची साठवण करण्यासाठी स्वच्छ आणि थंड वातावरण असलेली जागा असावी. यामुळे पल्प दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतो.
■ पॅकिंग यंत्र (सीलर)
पल्प बाटल्यांमध्ये भरल्यानंतर त्या सील करण्यासाठी हँड सीलर किंवा छोट्या प्रकारचे पॅकिंग यंत्र आवश्यक आहे, ज्यामुळे पल्प सुरक्षित राहतो.
इतर सुविधांची आवश्यकता
■ वायुवीजन
युनिटमध्ये स्वच्छ हवेचे वायुवीजन असणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे वातावरण स्वच्छ आणि सुरक्षित राहते.
■ कचरा व्यवस्थापन
सीताफळ प्रक्रिया करताना निर्माण होणारा जैविक कचरा व्यवस्थापित करण्यासाठी योग्य साधने असावी.
प्रकल्पासाठी लागणारा अंदाजित खर्च या प्रकल्पाचा अंदाजे खर्च
■ पल्पिंग मशीन : रु. १.७५ लाख (ऐच्छिक)
■ फ्रिजर : रु. ७५ हजार.
■ सीलिंग मशीन : रु. ६ हजार.
■ इतर भांडी आणि साधनसामग्री : रु. ४४ हजार. म्हणजेच एकूण प्रकल्प खर्च रु. ३.०० लाख इतका होईल.
अधिक वाचा: Sitafal Pulp : सीताफळापासून कसा तयार केला जातो पल्प? जाणून घेऊया सविस्तर प्रक्रिया