Join us

Sugarcane : गाळप हंगाम तोंडावर आला तरी मागच्या हंगामातील ७२ कोटी कारखान्यांकडे थकीत!

By दत्ता लवांडे | Published: September 19, 2024 9:09 PM

Sugarcane : यासंदर्भात साखर आयुक्तालयाने राज्यातील ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे. 

Sugar Industry : यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्याची लगबग सुरू आहे. येणाऱ्या १ नोव्हेंबर रोजी साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. परंतु, अद्याप काही कारखान्यांनी मागील गाळप हंगामातील एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून साखर आयुक्तालयाने राज्यातील ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे. 

दरम्यान, शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या ११ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने कारवाई केल्यानंतर त्यातील ६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देऊ केले आहेत. तर १५ सप्टेंबरअखेर आरआरसी कारवाई केलेल्या ५ साखर कारखान्यांकडे २३ कोटी रूपये थकीत आहेत. इतर कारखान्यांकडे थकीत असलेल्या एफआरपीचा विचार केला तर एकूण ७२ कोटी रूपये कारखान्यांकडे थकीत आहेत. (Sugar Industry Latest Updates)

साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, राज्यात २०२३-२४ हंगामात २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यामध्ये १ हजार ७६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून ११० लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर तोडणी आणि वाहतूक खर्चासहित ३६ हजार ७५३ कोटी रूपये एवढी एफआरपी रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. पण यातील ३६ हजार ६८१ कोटी रूपयांची रक्कम अदा करण्यात आली असून ७२ कोटी रूपये अद्याप कारखान्यांकडे बाकी आहेत.

राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली असून केवळ ११ साखर कारखान्यांकडे ही रक्कम बाकी आहे. एकूण एफआरपी रक्कमेचा विचार केला तर ९९.८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली असून केवळ ०.२० टक्के रक्कम देणे बाकी आहे. ज्या साखर कारखान्यांकडे रक्कम बाकी आहे अशा कारखान्यांवर आयुक्तालयाने कारवाई केली आहे. 

आरआरसीची कारवाई केलेल्या कोणत्या कारखान्यांकडे रक्कम बाकी?१) मातोश्री लक्ष्मी शुगर कोजनरेशन इंड.लि., रूद्देवाडी, ता. अक्कलकोट, जि.सोलापूर - ५ कोटी ७० लाख२) विठ्ठ्ल रिफाईंड शुगर्स लि, पांडे, ता, करमाळा - ४ कोटी २५ लाख३) श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना - ६३ लाख४) कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखाना लि. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा - ९ कोटी ८४ लाख५) जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर - २ कोटी ७५ लाख

टॅग्स :ऊसशेती क्षेत्रशेतकरीसाखर कारखाने