कोल्हापूर : गेली दीड महिने ताणलेल्या ऊस दराच्या आंदोलनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नेमलेल्या समितीला 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मान्यता दिल्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये संघटनेने दिलेल्या नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांकडे माहिती मागविली आहे. आज, शनिवारी ही माहिती संघटनेला दिली जाणार असून, संघटना व कारखानदारांमध्ये सकारात्मक संवाद सुरू झाल्याने सोमवार (दि. २०) पर्यंत ऊस दराचा तोडगा निघण्याची शक्यता आहे.
मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपये व चालू हंगामातील उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर द्या, या मागणीसाठी 'स्वाभिमानी'चे गेली दीड महिना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. नोव्हेंबर निम्मा झाला तरी तोडगा निघत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. याबाबत, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी साखर कारखानदार, संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली. मागील ४०० रुपयांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांनी सुरुवातीला समितीला विरोध केला, नंतर संमती दर्शविली.
त्यानंतर शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू होती. यावेळी संघटनेच्या वतीने स्वस्तिक पाटील यांनी कारखान्याकडून मागील हंगामातील अपेक्षित माहितीचा नमुना दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने साखर कारखान्यांना पाठवून आज, शनिवारपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले. आज माहिती संघटनेला दिल्यानंतर आगामी दोन दिवसांत यावर चर्चा होऊन तोडगा निघू शकतो.
बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे, साखर कारखान्यांकडून विजय औताडे, पी. मेढे, योगेश श्रीमंत पाटील, आदी उपस्थित होते.
कारखान्याकडे ही मागितली माहिती
- मागील २०२२-२३ आर्थिक वर्षाचा ताळेबंद
- ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत साखर विक्री, इतर विक्रीतून मिळालेले उत्पन्न व खर्च
- आर्थिक वर्षानंतर म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ पर्यंतची साखर, बगॅस, मोलॅसिस, इथेनॉल विक्री व खर्च