Join us

ज्वारीच्या या प्रक्रीया उद्योगातून शेतकऱ्यांना कमाईची उत्तम संधी

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 14, 2024 1:50 PM

शेतकऱ्यांना अधिक कमाई करण्याची दारे खूली, ज्वारीपासून तयार होणाऱ्या या प्रक्रीया पदार्थांमधून आर्थिक उत्पन्नाचा मिळणार मार्ग

भारतात लोकांच्या आहारात मोठ्या प्रमाणात ज्वारीचं प्रमाण आहे. दक्षिणेत तर ज्वारीच्या पिठाच्या पातळ भाकऱ्या, घुगऱ्या, पातळ पोरजी करण्यासाठी होतो. तसा अनेक पारंपरिक पद्धतीने लाह्या, पापड्या, भातवड्या व हुरड्यासाठी ज्वारीचा वापर मुख्यत: होतोच. 

भारत हा जगातील ज्वारी उत्पादक देशातील चौथ्या क्रमांकाचा देश असून एकूण उत्पादनाच्या १८ टक्के वाटा भारताचा आहे. महाराष्ट्रा खालोखाल कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

देशात मिलेटच्या वाढत्या मागणीमुळे तसेच सरकारने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर केल्याने अनेक शेतकऱ्यांना ज्वारी पेरण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे ज्वारीच्या प्रक्रीया उद्योगांमधून शेतकऱ्यांना अधिक कमाई करण्याची दारे खूली होऊ शकतात. बदलत्या जीवशैलीमुळे शहरात तसेच गावोगावी अनेकांचा रेडीमेड उन्हाळी पदार्थ विकत घेण्याकडे कल वाढला आहे.

दरम्यान या प्रक्रीया उद्योंगांमधून शेतकऱ्याना साधता येईल आर्थिक प्रगती...ज्वारीच्या लाह्या- मक्याप्रमाणेच ज्वारीपासून चांगल्या लाह्या तयार होऊ शकतात. त्यासाठी राजहंस, कोंडवा, झिलारी या स्थानिक वाणांचा अनेकजण वापर करतात. मोठ्या आकाराच्या चविष्ट लाह्यांच्या प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतील.

ज्वारीचा रवा- ज्वारीच्या दाण्यांना पॉलिश केले असता त्यापासून विविध ग्रेडचा रवा तयार करता येतो. यापासून उपमा, दोसा, इडली, शेवया, शिरा, लाडू, असे विविध पदार्थ बनवता येतात. 

ज्वारीचा मिश्र आटा-ज्वारीला मोड आणून पीठ केल्यास त्यातील प्रथिनाची प्रत सुधारते. मुक्त अमिनो ऑसिड्‌स वाढतात. साखर वाढते, प्रथिनाची, स्टार्चची पचनक्षमता सुधारते. ज्वारीच्या माल्टयुक्त पिठात सोयाबीन आणि नाचणीचे माल्टयुक्त पीठ मिसळून पॉलिप्रोपीलीनच्या पिशव्यात भरून हवाबंद करून ठेवल्यास सहा महिने टिकते.

ज्वारीची बिस्किटे : ज्वारीच्या माल्ट पिठात नाचणी, सोयाबिनचे माल्ट पीठ, मिल्क पावडर घालून साखर विरहित क्रिमसह, प्रथिनयुक्त, उच्च तंतुमय आणि कमी कॅलरीज असणारी उत्तम प्रतीची बिस्किटे तयार करता येतील.

ज्वारीचे पोहे : ज्वारीच्या दाण्यावरील जाडसर थर (परलिंग) मशिनने काढून टाकून कुकरमध्ये उकडून घेताना त्यात थोडसं सायट्रिक आम्ल आणि मीठ घालतात. उकडल्यानंतर बाहेर काढून ते दाणे पोह्याच्या मशिनने चपटे करून ड्रायरने चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत सुकवावेत. असे पातळ पोहे पॅकिंग करून विकावेत.

पापडासाठी ज्वारी : पांढरी चिकनी आणि तांबडी चिकनी या जातीपासून उत्कृष्ट प्रकारचे पापड व कुरडई तयार करता येतात.

टॅग्स :ज्वारीव्यवसायशेतकरीपैसाशेती क्षेत्र