Join us

हळदीला चांगला बाजारभाव हवाय? पारंपरिक शिजवणीपेक्षा या पद्धतीने वाचतो वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:32 AM

खबरदारी घ्या; हळद शिजवणीचे काम जोखमीचे

सध्या सर्वत्र हळद काढणीची लगबग सुरू असून, काही शेतकरी हळद शिजवणीचे कामही करीत आहेत. आधुनिक पद्धतीने बनविलेल्या कुकरद्वारे हळद शिजविण्यात येत आहे; परंतु हळद शिजवणीचे काम अतिशय जोखमीचे असून, हे काम करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

वसमत तालुक्यातील कौठा परिसरात शेतकऱ्यांकडून पिवळे सोने अर्थात हळदीला प्राधान्य दिले जाते. यंदा मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्यात आली होती. सध्या बाजारात भावही चांगला असल्याने शेतकरी हळद काढणीला वेग देत आहेत; परंतु उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. हळद काढणीला वेग आला आहे.

हळद काढणीनंतर हळद शिजविण्याचे काम अत्यंत जोखमीचे आणि कष्टाचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून आता मात्र पारंपरिक पद्धतीला छेद देत आधुनिक पद्धतीने कूकरद्वारे हळद शिजवण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. या परिसरात पूर्वी हळद शिजवण्यासाठी मोठमोठ्या कढईचा वापर केला जायचा. त्यासाठी लाकडेही मोठ्या प्रमाणात लागायची. कढईद्वारे हळद शिजवणे मोठे जोखमीचे असल्याने हे काम अवघड होते. पाणीसुद्धा जास्त लागायचे; परंतु आता मात्र हळद शिजवण्यासाठी आधुनिक कुकरचा वापर केला जात आहे. कूकरवर हळद शिजविणेही जोखमीचे आहे; परंतु पूर्वीपेक्षा सोयीचे झाले आहे.

कूकरमुळे वाचतो वेळ

कूकरचा हळद शिजवण्यासाठी वापर होत असून, यामुळे पूर्वीपेक्षा मेहनत वाचली आहे; तसेच कामही लवकर होत आहे. त्यामुळे कढईपेक्षा कुकरमध्ये हळद शिजविणे परवडते. - पंडित खराटे, शेतकरी

कौठा परिसरात यंदा हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या बहुतांश शेतकरी हळद काढणीचे काम करीत असून, ज्यांनी हळद काढली ते आता शिजवीत आहेत. त्यामुळे कूकरला मागणी वाढली आहे. - रुखमाजी खराटे, शेतकरी

हळद कशासाठी शिजवतात?

८ ते ९ महिन्यांनी तयार झालेली हळद शेतातून खणून काढली की ती आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते.या कामी कमी वेळ, कमी मजूर, कमी इंधन लागते. अशा मालास चांगली चकाकी येते. परिणामी बाजारभाव चांगला मिळतो. अशा पद्धतीचा वापर केल्यास कमी वेळात हळद व्यवस्थित शिजवली जाते आणि मजूर, श्रम, इंधन यांचा अपव्यय टाळता येतो. शिजवलेली हळद ही चांगल्या कठीण अगर सिमेंट काँक्रीटच्या खळ्यावर वाळवावी लागते.

अधिक माहितीसाठी- हळद काढणीनंतर पारंपारिक पद्धतीने कढईत हळद शिजविताना काय काळजी घ्यावी?

अशाच कृषीविषयक बातम्यांसाठी लाेकमत ॲग्रोचा व्हॉट्सॲप ग्रूप जॉइन करा..

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकाढणी